Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:43 IST2025-11-17T12:39:38+5:302025-11-17T12:43:53+5:30
Animal Rights Activists Protest: मुंबईतील भटक्या कुत्र्यांवर सुरू झालेल्या कारवाई विरोधात रविवारी सायंकाळी शिवाजी पार्क परिसरात युवक काँग्रेस आणि विविध प्राणीमित्र संघटनांनी जोरदार निदर्शने केली.

Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील भटक्या कुत्र्यांवर सुरू झालेल्या कारवाई विरोधात रविवारी सायंकाळी शिवाजी पार्क परिसरात युवक काँग्रेस आणि विविध प्राणीमित्र संघटनांनी जोरदार निदर्शने केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत महापालिकेकडून घाईगडबडीने आणि पर्यायी व्यवस्था न करता भटक्या कुत्र्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते शिवाजी पार्क येथे जमले. भटक्या कुत्र्यांना स्वतःसाठी आवाज उठवता येत नसताना त्यांच्यावर होणारी क्रूर कारवाई अमानवी असल्याचे त्या म्हणाल्या.
न्यायालयाचा आदेश व्यापक असून त्याच्या अंमलबजावणीपूर्वी शेल्टर होम, वैद्यकीय सुविधा आणि श्वान संख्या नियंत्रण प्रणाली उभी करणे अनिवार्य असताना प्रशासनाने कोणतीही पूर्वतयारी न करता कारवाई सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.
भटके प्राणीही शहराचा भाग आहेत आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. दादरमधील कबुतरखाना प्रकरणात पर्यायी व्यवस्था शोधली गेली, तसेच येथेही उपाय शोधणे सरकारची जबाबदारी असल्याचे शबरीन यांनी स्पष्ट केले. युवक काँग्रेस प्राणीप्रेमी आणि हक्कांसाठी कार्य करणाऱ्या संघटनांच्या ठाम पाठीशी असल्याचे त्या म्हणाल्या.