मुंबईत तरुणाई, बच्चेकंपनीने साकारले रायगडसह राजगड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 12:05 IST2025-10-22T12:04:54+5:302025-10-22T12:05:32+5:30
दिवाळीनिमित्त किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे बांधले तोरण

मुंबईत तरुणाई, बच्चेकंपनीने साकारले रायगडसह राजगड
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याच्या दुर्गांचा इतिहास, संरचना आणि माहितीची देवाण-घेवाण करण्यासोबतच नव्या पिढीला संस्कृती, परंपरेची माहिती उत्सवांतून देण्यासाठी दिवाळीच्या निमित्ताने मुंबईकर मुले, तरुणाईने येथे ठिकठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. लालबागपासून दादर, घोडपदेव, कुर्ल्यापासून मुलुंड व विलेपार्ले येथे उभे राहिलेले हे किल्ले जणू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देत असून ते उत्सवाचा थाट वाढवत आहेत.
मुले जेव्हा माती, विटा, दगड, इत्यादी साहित्य वापरून किल्ल्यांची प्रतिकृती तयार करतात, तेव्हा त्यांचे कल्पनाशक्ती, संघटन कौशल्य, नियोजन आणि इतिहास विषयीचे प्रेम वाढते. दिवाळी हा प्रकाशाचा आणि नवसंकल्पाचा सण आहे. शिवरायांनीही अंधारमय गुलामीच्या काळातून रयतेला बाहेर काढून स्वराज्याचा दीप उजळला. म्हणूनच दिवाळीत किल्ले बांधण्याची परंपरा ही केवळ कलेची नव्हे, तर जाणिवेची आणि इतिहासाशी नाळ जोडणारी एक शिस्तबद्ध परंपरा आहे, असे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाकडून सांगण्यात आले.
दिवाळीनिमित्त मुलांनी तयार केलेले किल्ले लक्षवेधी ठरले आहेत. पालकही त्यांचे कौतुक करत आहेत. दादर, लालबाग, चिंचपोकळी, वडाळा, घोडपदेव या आणि अशा बऱ्याच ठिकाणी दिवाळीत लहान मुलांनी मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेल्या रायगड, राजगड, सिंहगड आदी किल्ल्यांच्या मातीच्या प्रतिकृती पाहता येत आहेत. चंदन विचारे, दुर्ग अभ्यासक
अनेक पालक आपल्या मुलांना इतिहास शिकवण्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत आणि पुस्तकी अभ्यास पुरेसा ठरत नाही. अशा वेळी दिवाळीतील किल्ले ही इतिहास शिकवण्याची एक जिवंत संधी आहे. शाळांनीही हे प्रतिकृतीचे किल्ले फक्त स्पर्धेपुरते न ठेवता, दिवाळीनंतर शाळेच्या प्रांगणात प्रदर्शनासाठी ठेवावेत, जेणेकरून इतर मुलांनाही त्यातून प्रेरणा मिळेल आणि इतिहासासोबत त्यांच्या नात्याला अर्थ प्राप्त होईल. राहुल मेश्राम, सहसचिव, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ.