माझा धर्म मला वंदे मातरम म्हणण्याची परवानगी देत नाही, असं सांगत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वंदे मातरम म्हणण्यास नकार दिल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वंदे मातरमच्या मुद्द्यावरून अबू आझमी यांना खरमरीत भाषेत सुनावले आहे. तुमचं विधान या देशातल्या सगळ्या धर्मातील भारतीयांच्या भावना दुखावणारे आहेच परंतु त्यापुढे तुमच्या स्वतःच्या आईचा व इस्लाम धर्मातील सर्व मातांचा अपमान करणारं आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
अबू आझमी यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आईसमोर झुकणं हे आमच्या धर्माला मान्य नाही त्यामुळं आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही" अशा स्वरूपाचं विधान तुम्ही केलं. हे ऐकून मला तुमची कीव आली.
‘‘मातृदेवो भवः" ही आपली संस्कृती आहे. आमच्यासाठी आम्हाला जन्म देणारी आमची आई आहेच परंतू त्यापुढे जाऊन आम्हाला घडवणारी, वाढवणारी व आपल्यात सामावून घेणारी भारतमाता देखील आई आहे. मला खात्री आहे की, जगातला प्रत्येक धर्म हीच शिकवण देत असणार. तुमच्यासारखी काही मंडळी समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी असली सवंग विधानं करत असतात, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
तुमचं विधान या देशातल्या सगळ्या धर्मातील भारतीयांच्या भावना दुखावणारे आहेच परंतु त्यापुढे तुमच्या स्वतःच्या आईचा व इस्लाम धर्मातील सर्व मातांचा अपमान करणारं आहे. आपले विधान मागे घेऊन त्याबद्दल माफी मागण्याची सुबुद्धी तुम्हाला अल्लाह देवो ही प्रार्थना! एक भारतीय म्हणून व या भारतमातेचा पुत्र म्हणून मी आपल्या विधानाचा तीव्र निषेध करतो, असेही बावनकुळे यांनी यावेळी सुनावले.