तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले; कागदपत्रांद्वारे मालकी मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 10:06 IST2025-10-17T10:05:40+5:302025-10-17T10:06:13+5:30
उद्गम पोर्टलवर नातेवाइकांनी दावा न केलेल्या पैशांचा त्वरित घ्या शोध

तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले; कागदपत्रांद्वारे मालकी मिळवा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील विविध बँका आणि नियामक संस्थांकडे तब्बल १.८४ लाख कोटी रुपयांची आर्थिक मालमत्ता बेवारस अवस्थेत पडून आहे. त्यासाठी सरकारने आपकी पूंजी, आपका अधिकार या मोहिमेचा शुभारंभ केला असून, आरबीआयने उद्गम नावाचे पोर्टल तयार केले आहे. दावेदार किंवा वारसांनी कागदपत्रे सादर केल्यास या पैशांवर वैध दावा करता येणार आहे.
कोणती कागदपत्रे, पुरावे गरजेचे?
बेवारस पैशांवर दावा करण्यासाठी ओळखपत्र (आधार, पॅन, पासपोर्ट), बँक किंवा वित्तीय दस्तऐवज (पासबुक, स्टेटमेंट, विमा पॉलिसी, शेअर, म्युच्युअल फंड प्रमाणपत्र) आणि जर मृत व्यक्तीचे वारस असाल तर वारसहक्क प्रमाणपत्र आवश्यक असते.
याशिवाय संबंधित बँक किंवा नियामकाने विचारलेली अन्य कागदपत्रे सादर करावी लागतात.
‘आपकी पूंजी,
आपका अधिकार’
केंद्र सरकारने नागरिकांना त्यांच्या दावा न केलेल्या संपत्तीचा शोध घेण्यास ‘आपकी पूंजी, आपका अधिकार’ मोहीम सुरू केली आहे.
पैसे परत मिळणार
ग्राहकांनी त्यांच्या दावा न केलेल्या निधींची माहिती घेण्यासाठी उद्गम पोर्टलचा वापर करावा. योग्य कागदपत्रांसह पुढे आल्यास त्यांचे पैसे सुरक्षितरीत्या मिळतील. असे बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कसा करावा दावा?
पैशांवर दावा करण्यासाठी प्रथम उद्गम पोर्टल किंवा संबंधित बँक, नियामकाच्या वेबसाइटवर जाऊन चौकशी करावी. कोणती रक्कम कुठे आहे.
पैशांवर दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह आयईपीएफ, सेबीकडून दिलेल्या प्रक्रियेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करा.
अनक्लेम्ड पैसे
सरकारकडे सुरक्षित
दावा न केलेले किंवा अनक्लेम्ड पैसे सरकारी संस्था आणि नियामकांकडे पूर्णपणे सुरक्षित ठेवलेले असतात.
बँक डिपॉझिट्स, विमा पॉलिसी, पीएफ, शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांचा समावेश होतो.
बेवारस पैसे म्हणजे काय?
बेवारस पैसे म्हणजे ज्या रकमेवर काही काळासाठी त्यांच्या मालकांकडून दावा न केल्यामुळे ती शासनाकडे सुरक्षित ठेवलेली असते.