मुंबई : कॉलेज विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी पायधुनी पोलिसांनी २० वर्षीय प्रियकराला अटक केली आहे. सोहम बेंगडे असे या आरोपीचे नाव आहे.
मस्जिद बंदर परिसरात कुटुंबीयांसोबत राहणारी कॉलेज विद्यार्थिनी चर्नीरोड येथील महाविद्यालयात बँकिंग क्षेत्राशी निगडित शिक्षण घेत होती. ती ८ मार्च रोजी कॉलेजहून नेहमीप्रमाणे घरी परतली. कुटुंबीयांच्या कॉलला तिने प्रतिसाद दिला न दिल्याने त्यांनी शेजाऱ्यांना फोन केला. तेव्हा मुलगी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
सीसीटीव्ही तपासात सोहम हा घरात वारंवार डोकावताना दिसला. दोघांमधील संदेशावरून सोहम तिच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालत होता आणि तिला नाहक त्रास देत असल्याचे दिसून आले. याच तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले.