मुंबई : साखरपुड्यानंतर लग्नाची लगबग सुरू झाली. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव लग्न मोडून नॉट रिचेबल झाल्याने सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलीने पोलिसांत तक्रार दिली. भोईवाडा पोलिस त्या डॉक्टर तरुणाचा शोध घेत आहेत.
तक्रारदार तरुणी एका रुग्णालयात लॅब टेक्निशियन आहे. २०२१ मध्ये ती काम करत असलेल्या रुग्णालयात प्रॅक्टिस करणाऱ्या २८ वर्षीय डॉक्टरसोबत तिची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. गेल्या वर्षी दोघांचा साखरपुडा झाला. दरम्यान तरुणाला लॉटरीत वांगणी येथे घर लागले. दोघांनी घराची रक्कम भरण्याचे ठरवले. त्यासाठी तरुणीने पावणे दोन लाख भरले. त्याला महागडा फोनही दिला. मात्र अचानक लग्न करता येणार नाही, असे सांगून दोन महिन्यांतच तरुणाने संबंध तोडले. त्याने सोशल मीडिया अकाउंट डिलीट करत मोबाइल बंद करत गायब झाल्याने तरुणीला फसवणूक झाल्याची खात्री पटली.