Mumbai Crime:मुंबई पोलीस दलात अवघ्या दीड महिन्यापूर्वी भरती झालेल्या एका ३२ वर्षीय पोलीस शिपायाने प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. कलिना पोलीस मुख्यालयात ही धक्कादायक घटना घडली असून, मृत जवानाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रेयसीच्या आई-वडिलांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे.
मूळचा परभणीचा रहिवासी असलेला भैयासाहेब भीमराव वावले (३२) हा तरुण ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई पोलीस दलात चालक पदावर रुजू झाला होता. अत्यंत कष्टाने मिळवलेली सरकारी नोकरी आणि उज्ज्वल भवितव्य समोर असतानाच, १५ मार्च रोजी त्याने कलिना प्रशिक्षण केंद्रात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे
वाकोला पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट हस्तगत केली. या चिठ्ठीत भैयासाहेबने आपल्या मनातील वेदना मांडल्या होत्या. त्याचे नांदेड येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, मात्र मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला कडाकड विरोध होता. "एकतर जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवून तुला पोलीस दलातून सस्पेंड करायला लावू," अशी थेट धमकी प्रेयसीच्या वडिलांनी दिली होती, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. फक्त वडिलांनीच नव्हे, तर प्रेयसीच्या आईनेही त्याला वारंवार मानसिक त्रास दिला आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा दावा मृत जवानाच्या वडिलांनी केला आहे.
मुलीच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल
भैयासाहेबच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार आणि सुसाईड नोटमधील हस्ताक्षराच्या खातरजमेनंतर, वाकोला पोलिसांनी प्रेयसीच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलीचे लग्न दुसरीकडे लावून देण्यासाठी भैयासाहेबला सतत धमकावले जात होते, ज्यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता.
पोलीस तपासाला वेग
सुसाईड नोटमधील अक्षर माझ्या मुलाचेच आहे, असा दावा त्याच्या वडिलांनी केला असून पोलिसांनी ती नोट फॉरेन्सिक तपासासाठी पाठवली आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुण पोलीस जवानाला अशा प्रकारे जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे. वाकोला पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Summary : Mumbai police constable commits suicide after alleged threats from girlfriend's parents. They opposed the relationship, threatening job loss. Police investigate abetment.
Web Summary : मुंबई पुलिस कांस्टेबल ने कथित तौर पर प्रेमिका के माता-पिता से धमकियों के बाद आत्महत्या कर ली। उन्होंने नौकरी खोने की धमकी दी थी। पुलिस जांच कर रही है।