Juhu Toddler Death: मुंबईतील जुहू परिसरात दोन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा तोल गेल्याने दोन वर्षांच्या मुलीवर पडला, त्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी निष्काळजीपणाच्या आरोपाखाली जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी हर्षद गौरव याच्याविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूची नोंद केली आहे. दोन दिवसांपासून या मुलीवर उपचार सुरु होते. मात्र चिमुकलीचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जुहू पोलिसांनी ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या गुरुवारी घडली जेव्हा विधी अग्रहरी नावाची मुलगी तिच्या वडिलांच्या दुकानाजवळ खेळत होती. त्यावेळी गौरव आणि त्याचा मित्र शाहनवाज अन्सारी हे दुकानाजवळ बसून बोलत होते. आरोपी हर्षद गौरव हा मित्रासोबत तिथे मस्ती करत होता. विधीच्या आईने दोघांनाही मुलीच्या इतक्या जवळ खेळू नका आणि दुसरीकडे कुठेतरी जा असं सांगितले होते. पण दोघांनाही तिचे ऐकले नाही. गौरव आणि त्याचा मित्र अन्सारी मस्करी करत होते, बोलत होते आणि एकमेकांना धक्काबुक्की करत होते. तेव्हा गौरवचा तोल गेला आणि तो विधीच्या अंगावर पडला.
हर्षदचा तोल गेला आणि तो मुलीच्या अंगावर पडला, त्यामुळे विधीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. आम्ही आमची एकुलती एक मुलगी गमावली आहे. आम्ही कठोर कारवाई आणि शिक्षेची मागणी करतो. त्यांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलीचा जीव गेला, असं विधीच्या वडिलांनी म्हटलं.
"तो अन्सारीसोबत हिंसक मस्ती करत होता. यामुळे माझ्या पत्नीला थोडी काळजी वाटली. ही दोघेही त्या परिसरातील स्थानिक मुले आहेत. त्याआधी ते तिथून निघून गेले होते. मात्र काही मिनिटांनी परत आले आणि त्याच ठिकाणी एकमेकांना ओढू लागले आणि धक्काबुक्की करू लागले. अचानक हर्षदचा तोल गेला आणि तो विधीवर पडला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गोंधळ ऐकून माझी पत्नी धावत बाहेर आली आणि तिने आमच्या मुलीच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव होताना पाहिले. हर्षदसह आम्ही सर्वांनी तिला कूपर हॉस्पिटलमध्ये नेले जिथे दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला," असे मुलीच्या वडिलांना सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. नंतर मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारावर विद्यार्थ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता च्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.