चित्रीकरणासाठी जे.जे.मध्ये पाचपट पैसे मोजावे लागणार; सरकारवर टीका न करण्याचे धोरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 06:37 IST2022-06-04T06:37:12+5:302022-06-04T06:37:17+5:30
सरकारवर टीका न करण्याचे धोरण कायम

चित्रीकरणासाठी जे.जे.मध्ये पाचपट पैसे मोजावे लागणार; सरकारवर टीका न करण्याचे धोरण
मुंबई : जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् आणि जे. जे. फाईन आर्टस् परिसरातील चित्रीकरणाच्या दरात पाचपट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या महाविद्यालयांच्या परिसरातील उद्याने आणि ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वास्तूंच्या पार्श्वभूमीवर लघुपट किंवा चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) शुक्रवारी जारी केला आहे.
चित्रीकरण करताना शासनाच्या ध्येय धोरणांबाबत कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी करता येणार नसल्याचे या आधीचे धोरण कायम ठेवण्यात आल्याचे जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. विभागाने जारी केलेल्या जीआरनुसार जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् समोरील उद्यान व त्या भोवतालचा परिसर, जे. जे. फाईन आर्टससमोरील परिसर आणि अधिष्ठाता बंगला परिसरातील चित्रीकरणासाठी संबंधित दर लागू करण्यात आले आहेत.
असे असतील दर
- २४ तासांसाठी : पाच लाख
- १२ तासांसाठी : अडीच लाख
दहा वर्षांनंतर भाड्यात वाढ
सध्या हा दर अनुक्रमे एक लाख रुपये आणि पन्नास हजार इतका आहे. दहा वर्षांत चित्रीकरणासाठीच्या भाड्यात वाढ केली नव्हती. यासोबतच ऐनवेळी चित्रीकरणाचा कालावधी वाढल्यास वाढीव कालावधीसाठी ताशी २५ हजार मोजावे लागणार आहेत. शिवाय, चित्रीकरणासाठी मान्य केलेला कालावधी बदलण्यासाठीसुद्धा तीन लाख रुपये अतिरिक्त भरावे लागतील, असे या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
भाडे पाच दिवस आधी भरावे लागणार
सध्याचे दर दहा वर्षांपूर्वी निश्चित केले होते. सात दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी आता चित्रीकरणाच्या १५ दिवस आधी अर्ज करावा तर सात दिवसांपेक्षा अधिक काळासाठी चित्रीकरण करायचे असेल तरच दोन महिन्यांआधी अर्ज करावा लागणार आहे. तर, चित्रीकरणासाठीची भाड्याची रक्कम पाच दिवस आधी भरावी लागणार आहे.