घरातील नेतेगिरी : ‘तू हे करू शकतोस’ हा आत्मविश्वास पत्नीने दिला - प्रसाद लाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 09:42 IST2025-01-12T09:41:33+5:302025-01-12T09:42:26+5:30

Prasad Lad : कधी यश तर कधी अपयश आले. संकटकाळात ती सोबत होती. हे तू करू शकतोस हा आत्मविश्वास तिने दिला.

'You can do this' was given to me by my wife - Prasad Lad | घरातील नेतेगिरी : ‘तू हे करू शकतोस’ हा आत्मविश्वास पत्नीने दिला - प्रसाद लाड

घरातील नेतेगिरी : ‘तू हे करू शकतोस’ हा आत्मविश्वास पत्नीने दिला - प्रसाद लाड

- प्रसाद लाड, आमदार, भाजप

आमदार बाबूराव भापसे यांची मुलगी नीता ही माझी पत्नी. कॉलेजमध्ये असताना आमचे प्रेम जुळले. आम्ही पळून जाऊन लग्न केले. आईने फोन करून त्यांच्या कानावर ही बातमी घातली. त्यांनी मुलीला फक्त इतकेच सांगितले, तू माझी लक्ष्मी होती आणि आता त्याची लक्ष्मी झालीस. आम्ही घरी आलो. तेव्हा मी १९ वर्षांचा होतो. घरची परिस्थिती चांगली नव्हती. व्यवसाय सुरू केला.

कधी यश तर कधी अपयश आले. संकटकाळात ती सोबत होती. हे तू करू शकतोस हा आत्मविश्वास तिने दिला. राजकारण, व्यवसायात गुंतल्यामुळे सायली आणि शुभम या मुलांकडे लक्ष देता आले नाही. त्यांचे संगोपन तिनेच केले. माझे आणि मुलांचे आयुष्य घडविण्यात तिचे खूप मोठे योगदान आहे. त्याबद्दल तिचे आभार मानलेच पाहिजेत. आमच्या यशाचे सर्व श्रेय तिलाच आहे.

राजकारण आणि व्यवसाय अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असताना कुटुंबालाही प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे रात्री नऊच्या आत घरी पोहोचून कुटुंबासोबत  भोजन झाले पाहिजे, हा माझा प्रयत्न असतो. शनिवार किंवा रविवारी संध्याकाळी त्यांच्यासोबत बाहेर जातो. महिन्यातून एखादा चित्रपट, नाटक पाहतो. वर्षांतून दोन वेळा भारतात आणि भारताबाहेर सहा, सात दिवसांसाठी फिरायला जातो. काश्मीर आणि लंडन ही माझी आवडती ठिकाणे आहेत. 

... तर तिला राग येईल
घरामध्ये आज महाराज आहेत, नोकर आहेत; पण ज्या दिवशी ती घरी असते त्यावेळी स्वतः जेवण बनवते. सकाळी देवपूजा सुरू होते त्यावेळी ती नाश्त्याच्या तयारीला लागते. जर मी म्हणालो तिने केलेले कोंबडी-वडे आवडतात तर तिला राग येईल आणि मटण करायचे बंद करेल. त्यामुळे तिने केलेले सगळेच पदार्थ मला आवडतात. 

घाम आलेला आवडत नाही
जिथे स्वच्छता असते तिथे देवता असते, असे मी मानतो. शिस्तबद्ध असल्यामुळे कपडे, चप्पल, बूट, सॉक्स, घड्याळ, पेन या वस्तू टापटीप लागतात. सकाळी उठल्यावर बाथरुम, वॉशबेसीन स्वतः धुतो. त्यासाठी नोकर लागत नाही. घाम आलेला मला आवडत नाही. 

ती मैत्री अजूनही आहे
परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आमचा ६७ ते ६८ जणांचा शाळा मित्रांचा ग्रुप आहे. महिन्यातून एकदा माझ्या वेळेनुसार गेट टूगेदर होते. दिवाळीला त्यांना भेट पाठविणे, घरात कुठला चांगला कार्यक्रम असल्यास त्यांना बोलावणे. त्यांच्या अडीअडचणीला उभे राहणे, असे संबंध अजूनही जपले आहेत. 

बाळासाहेब, महाजन, पवार, फडणवीस यांच्याकडून शिकलो
भाजप, राष्ट्रवादी आणि पुन्हा भाजप असा माझा राजकीय प्रवास आहे. प्रमोद महाजन यांच्याकडून कॉर्पोरेट पॉलिटिक्स, तर राजकारणातून राजकारण कसे करायचे हे शरद पवार यांच्याकडून शिकलो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे आवडते व्यक्तिमत्त्व. दोन शिव्या द्यायचे, पण पाठीवर थापही मारायचे, असे आमचे संबंध होते. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजकारणातून समाजकारण कसे करावे, इतरांसोबत संबंध कसे दृढ ठेवावेत, हे शिकलो. 

मातोश्रीला क्रिस्टलची सिक्युरिटी
क्रिस्टल ही इंटीग्रेटेड फॅसिलिटी देणारी कंपनी आहे. कुठल्याही प्रॉपर्टीची सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरा, हाऊस किपिंग, क्लिनिंग, बिल्डिंग मॅनेजमेंट, इलेक्ट्रीकल, प्लम्बिंग सगळेच आम्ही करतो. वैयक्तिक पातळीवर कोणाला मदत देण्याचा प्रसंग कधी आला नाही; परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर कर्जत येथील त्यांच्या बंगल्याला आणि मातोश्रीला काही काळासाठी मैत्रीच्या दृष्टिकोनातून क्रिस्टलची सिक्युरिटी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी कामगारांचे पैसे देऊन त्याची परतफेड केली होती.

(शब्दांकन : महेश पवार)

Web Title: 'You can do this' was given to me by my wife - Prasad Lad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.