Join us

तुम्ही उपकार करत नाही, प्रदूषणाच्या मुद्द्यावरून कोर्टाने महापालिकेला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 07:31 IST

प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी मुंबई महापालिका पुरेसे प्रयत्न करत आहे.

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईच्या काही भागांत पाऊस पडला. त्यातच गुरुवारीही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हवेच्या दर्जात सुधारणा झाली. त्यामुळे पावसाचे आभारच मानायला हवेत. प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी मुंबई महापालिका पुरेसे प्रयत्न करत आहे. पण तुम्ही कोणावर उपकार करत नाहीत, ते तुमचे कर्तव्य आहे, अशा शब्दांत न्यायालयाने महापालिकेचे शुक्रवारी कान टोचले.

महापालिकेने बांधकामाच्या मलब्याची बांधकामाच्या ठिकाणी व त्याबाहेर नेण्यास घातलेल्या वाहतूक बंदीच्या आदेशात सुधारणा करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली. मात्र, न्यायालयाने ती मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. सद्यस्थिती पाहता पालिकेची मागणी मान्य करणे शक्य नाही. आम्ही मलबा वाहतुकीसंदर्भात दिलेले आदेश १९ नोव्हेंबरपर्यंत कायम करत आहोत. त्यानंतर हवेचा दर्जा सुधारला नाही तर संबंधित पालिकांनी निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले. महाराष्ट प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्यावतीने महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक समाधानकारक पातळीवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापासून सर्वांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतल्याचे न्यायालयाला सांगितले. तर  ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी १,०६५ बांधकामांना महापालिकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावल्याचे कोर्टास सांगितले. 

न्यायालयाने ६ नोव्हेंबर रोजी पर्यावरण व वायू प्रदूषण तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली. त्यात आणखी एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातील सर्व महापालिकांना या समितीकडे दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तर या समितीला न्यायालयात साप्ताहिक अहवाल सादर करण्याचे निर्देश देत याचिकेवरील पुढील सुनावणी ११ डिसेंबर रोजी ठेवली.

न्यायालय म्हणाले... प्रदूषणासाठी बांधकामे, फटाके व अन्य कोणत्या बाबी जबाबदार आहेत, हे शोधण्यासाठी व त्याची कारणे जाणण्याकरिता तज्ज्ञांकडून अभ्यास होण्याची गरज आहे. प्रदूषणाचे स्वरूप काय आहे, याचा काही अभ्यास करण्यात आला आहे का? प्रदूषणाची कारणे आणि उपाययोजना आखण्यासाठी तज्ज्ञांनी अभ्यास करणे आवश्यक आहे.

पाऊस पडून गेल्यावर  गारवा वाढणार महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण शनिवारपासून निवळण्याची शक्यता असून दुपारचे कमाल तापमान सामान्य राहून हळूहळू पहाटेच्या गारव्यात वाढ होईल. मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र शनिवारी ढगाळ वातावरण राहील. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या तीन जिल्ह्यात पाच दिवस म्हणजे १६ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता कायम आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून कमी दाब क्षेत्राच्या निर्मितीची शक्यता असली तरी पावसाची शक्यता जाणवत नाही. १७ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात हळूहळू थंडीची चाहूल लागू शकते, असे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईउच्च न्यायालयप्रदूषण