Yogesh Soman not on forced leave; So they have already applied for leave | योगेश सोमण सक्तीच्या रजेवर नव्हे; तर त्यांनी आधीच केलेला रजेचा अर्ज

योगेश सोमण सक्तीच्या रजेवर नव्हे; तर त्यांनी आधीच केलेला रजेचा अर्ज

मुंबई : विद्यापीठात विद्यार्थी, विद्यार्थी संघटना यांच्यामध्ये योगेश सोमण प्रकरणावरून वादंग सुरू असताना आता या प्रकरणी आणखी एक नवीन वळण आले आहे. १३ जानेवारी २०१९ रोजी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना रात्री ११.३० वाजता सोमण यांना रजेवर पाठवत असल्याचे पत्र कुलसचिवांनी आणून दिले होते. मात्र आता योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले नसून, त्यांनी आधीच रजेचा अर्ज केला होता आणि तो मान्य करण्यात आला असल्याचे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या या युटर्नवर सर्वच अधिकारी, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि संघटनांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

एकीकडे अ‍ॅकॅडमी आॅफ थिएटर आर्टचे विद्यार्थी, छात्र भारती विद्यार्थी संघटना, एआयएसएफचे कार्यकर्ते यांनी आंदोलन करून सोमण यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे अभाविपने राजकीय षड्यंत्र असल्याचे सांगत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निषेध केला. या निषेधाचाच भाग म्हणून अभाविपचे शिष्टमंडळ गुरुवारी कुलसचिवांची भेट घेण्यासाठी मुंबई विद्यापीठात पोहोचले आणि त्यांनी काही मागण्या केल्या. या मागण्यांमध्ये जर योगेश सोमण यांची नियुक्ती चुकीची असेल किंवा ते त्या पदासाठी अपात्र असतील, तर मागील ५ वर्षांत विद्यापीठात ज्या अधिकारी किंवा प्राध्यापकांच्या नियुक्त्या झाल्या त्यांच्या पात्रतेचीही चौकशी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

अभाविपच्या या निवेदनानंतर योगेश सोमण हे सक्तीच्या रजेवर नाहीत. ते पहिल्यापासूनच सुट्टीवर असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच कोणाचेही अभिव्यक्तिस्वातंत्र्य हिरावले जाणार नाही आणि निवेदनातील मागण्यांसाठी समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली.

गणेश चंदनशिवे यांची नियुक्ती
विद्यापीठाने नेमलेल्या सत्यशोधक समितीचा निर्णय येईपर्यंत प्रा. गणेश चंदनशिवे यांची थिएटर अ‍ॅण्ड आर्टसच्या प्रभारी संचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. चंदनशिवे यांनी यापूर्वी लोककला अकादमीचे विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

Web Title: Yogesh Soman not on forced leave; So they have already applied for leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.