Join us
Daily Top 2Weekly Top 5

बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी योगाभ्यास ही गुरुकिल्ली- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:20 IST

विकास तेव्हाच होतो जेव्हा नागरिकांचे आरोग्य उत्तम असते, असे पीयूष गोयल यावेळी म्हणाले. 

मुंबई: विकसित भारताचे स्वप्न २०४७ पर्यंत साकार करायचे असून त्यासाठी जनतेचे आरोग्य अबाधित राहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी योगाभ्यास ही गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी आजच्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने केले. उत्तर मुंबईत विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरांना भेटी देत त्यांनी सहभागी नागरिकांचे कौतुक केले. उत्तर मुंबईने आपण आरोग्याबाबतही आघाडीवर असल्याचे दाखवून दिले आहे. विकास तेव्हाच होतो जेव्हा नागरिकांचे आरोग्य उत्तम असते, असे पीयूष गोयल यावेळी म्हणाले. 

      संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरात पीयूष गोयल यांनी स्वत: योगाभ्यास केला. त्यानंतर शिबिराथींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा अकरावा जागतिक योग दिन साजरा होत आहे. योग दिन जागतिक पातळीवर साजरा व्हावा यासाठी पंतप्रधानांनी विशेष प्रयत्न केले. कारण योग हा भारताचा पुरातन वारसा आहे. त्याचे महत्व ओळखून संपूर्ण जग या परंपरागत आरोग्यपद्धतीकडे वळत आहे. संपूर्ण विश्वाला मनःशांती आणि शरीर तंदुरुस्त ठेवणाऱ्या योगाची देणगी भारताने जगाला दिली ही बाब भारतीयांसाठी अतिशय अभिमानाची आहे. योगामुळे केवळ शारीरिक आणि मानसिक लाभच होत नाही तर जीवनाचे संतुलन साधण्यासाठीही याचा उपयोग होतो. संपूर्ण जग आज या भारताच्या परंपरागत आरोग्यपद्धतीचा अनुभव घेत आहे.

  विश्वाच्या सर्व समस्यांची उत्तरे भारताकडे आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदी आणि १४० कोटींच्या युवा भारताकडे जगाचे लक्ष असल्याचे पीयूष गोयल यांनी नमूद केले. ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादाविरोधात भारताने पहिले पाऊल उचलले आणि इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्याचेही काम भारताने केले. मोदी यांच्या नेतृत्वात भारताचे भवितव्य उज्ज्वल असल्याची खात्री भारतीयांना आहे, असे ते म्हणाले.

     पीयूष गोयल यांनी कांदिवली येथे चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या योगा ऑन स्ट्रीटलाही उपस्थिती दर्शवली. त्यानंतर दहिसर येथे गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या योग शिबिराला मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांशी हितगुज केले. यावेळी पतंजली योग पिठ आणि अंबिका योग कुटीरला त्यांनी सन्मानित केले. पोयसर जिमखाना येथे योगशिबिर आयोजित करणाऱ्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :पीयुष गोयलयोगासने प्रकार व फायदेमुंबई