Join us  

होय, मला देव भेटला... मनाला चटका लावणारं कोल्हा'पूरातील देवदर्शन'

By महेश गलांडे | Published: August 10, 2019 6:29 PM

मुसळधार कोसळणारा पाऊस, पंचगंगा, कोयना अन् कृष्णामाईला आलेला पूर अन् गावागावात, घराघरात झालेलं पाणीच पाणी

मुंबई - कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती पाहून अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. यापूर्वीच्या 2005 साली आलेल्या महापूरापेक्षाही यंदाची परिस्थिती अधिकपटीने गंभीर आहे. शहरांसह गावच्या गावं पाण्याखाली गेली आहेत. या पूराच्या पाण्यात माणसंच काय तर जनावरही वाहून गेली आहेत. भिंत खचलीय, चूल विझलीय, होतं नव्हतं सारं गेलंय. केवळ गावतचं नाही, तर गावकऱ्यांच्या डोळ्यांतही पाणी साचलंय. या भीषण संकटाला सामारो जाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सरसावला. तर नेहमीप्रमाणे सैन्याचे जवान आपलं कर्तव्य बजावत आहेत. जीवाची बाजी लावून पुरात अडकलेल्या गावकऱ्यांचा जीव वाचवत आहेत. 

मुसळधार कोसळणारा पाऊस, पंचगंगा, कोयना अन् कृष्णामाईला आलेला पूर अन् गावागावात, घराघरात झालेलं पाणीच पाणी पाहून कित्येकांच्या डोळे पाणावले आहेत. कोल्हापूर अन् सांगलीच्या महापूराच्या बातम्या येऊ लागताच, नातेवाईकांचे फोन वाजू लागले. आपली माणसं नीट आहेत का, सुरक्षित आहेत का, त्यांना मदत मिळतेय का याची विचारपूस होऊ लागली. माध्यमांमध्ये पूराची बातमी झळकताच शासन अन् प्रशासन खडबडून जागे झाले. NDRF आणि सैन्य दलाच्या तुकड्यांनी कोल्हापूर अन् सांगलीत तळ ठोकले. सैन्याच्या जवानांनी पुन्हा एकदा आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचवला.

कोल्हापूरच्या पुरातील एक दृश्य अत्यंत बोलकं ठरलंय. सोशल मीडियावर तो व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. त्यामध्ये, सैन्य दलाने पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबीयाची सुखरुप सुटका केली होती. त्यावेळी, बोटीतून सुरक्षितस्थळी जात असताना बोटीतील महिलेला अश्रू अनावर झाल्याचं दिसलं. या महिलेनं चक्क देवाचा धावा केला, पण तिला देव भेटला होता तो पायात बुट घातलेला, अंगावर आर्मीचा ड्रेस परिधान केलेला अन् जीवाची बाजी लावणारा भारतीय सैनिक. त्या महिलेनं क्षणाचाही विचार न करता, बोटीतील जवानाचे पाय धरले. मनाला चटका लावून जाणारे हे दृश्य पाहून नेटीझन्स हळहळले. सैन्याच्या जवानानेही तितक्याच नम्रपणे अलगद आपला पाय पाठीमागे घेतला. जणू, ताई हे माझ कर्तव्यचं आहे, असंच काहीसं त्यांनी सूचवलं. मात्र, त्या माऊलीच्या डोळ्यातील पाणी, चेहऱ्यावरील भाव सारं काही सांगून जात होतं. 

याच जवानांनी एका घरात अडकलेल्या वृद्धासह त्यांच्या कुटुंबीयास बाहेर काढलं. त्यावेळी, पुराच्या पाण्यातून बाहेर येताच त्या वृद्धाने पडत्या पावसातच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. माध्यमांशी बोलताना, ''ही लोकं आमच्यासाठी देव आहेत, देवापेक्षाही जास्त आहेत ओ.... यांचे उपकार मी मेलो तरी फेडू शकणार नाही. माझी 8 महिन्यांची गरोदर सुन पुरात अडकली होती. या देवमाणसांनी तिला बाहेर काढलंय. मी हार्टचा पेशंटय, मलाही यांनी जीवदान दिलंय'' हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब पडत होते. काळीज हेलावणारं हे दृश्य पाहून कुणीही म्हणेल. होय मी देव पाहिला, आर्मीच्या सैन्यात, एनडीआरएफच्या सुरक्षा रक्षकांत, पुरात मदतीसाठी धावून आलेल्या जिगरबाज लोकांमध्ये. 

देशभरात कुठेही संकट आलं, तर एका आदेशावर सैन्य आपल्या जीवाची बाजी लावून तयार असते. महापूर येऊ दे, इमारत कोसळू दे, पूल पडू दे, देशात दहशतवादी घुसू दे किंवा सीमारेषेवर युद्ध होऊ दे... सैन्याचं जवान देवदूत बनून लोकांच्या मदतीला 'है तैय्यार हम' म्हणत पाठिशी उभे असतात. या जवानांचं कार्य आणि हिंमत पाहायची असेल तर ट्विटरवर NDRF, Indian Army आणि Coast guard, SpokepersonNavy या ट्विटर अकाऊंटला नक्की भेट द्या. तुमचे डोळे हळवारपणे पाणावतील, छाती अभिमानाने फुगेल आणि नकळत तोंडातून शब्द फुटेल सॅल्यूट सर....

दरम्यान, टीम इंडियाचा गोलंदाज हरभजन सिंग यानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याचा व्हिडीओ शेअर केला. त्यावेळी ''ह्युमिनिटी अँड गुडनेस'' असे कॅप्शन भज्जीने या व्हिडीओला पाहून सैन्याच्या कार्याला हात जोडून दिले.

टॅग्स :भारतीय जवानकोल्हापूर पूरमुंबईपाऊससांगली