Join us  

येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंच्या सीबीआय कोठडीत १० मेपर्यंत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 4:33 PM

Yes Bank scam: वाधवान बंधूंचा जेलमधील मुक्काम आणखीन वाढला आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी वाधवान बंधूंना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले. यावेळी सुनावणी दरम्यान, त्यांना 10 मे पर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचे निर्देश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहे.

मुंबई : येस बँकेतील हजारो कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी डीएचएलएफचे प्रमोटर्सचे कपिल वाधवान आणि त्याचा भाऊ धीरज वाधवान यांना केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाची (सीबीआय) 10 मे पर्यंत कोठडी मिळाली आहे.  

शुक्रवारी वाधवान बंधूंना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले. यावेळी सुनावणी दरम्यान, त्यांना 10 मे पर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचे निर्देश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे वाधवान बंधूंचा जेलमधील मुक्काम आणखीन वाढला आहे. याचबरोबर, वाधवान बंधूंचा येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याशी असलेले संबंध आणि येस बँक घोटाळ्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

वाधवान बंधूंना सीबीआयने गेल्या रविवारी सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. येस बँकेच्या 37000 कोटीच्या कर्ज मंजुरीच्या बदल्यात त्यांनी बँकेचा प्रमुख राणा कपूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या परदेशातील बँक खात्यावर 600 कोटीची लाच दिल्याचे तपासातून समोर आले. त्यानुसार त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार ( मनी लाड्रिंग प्रतिबंध कायद्यानवे ) सीबीआयने 7 मार्चला गुन्हा दाखल केला आहे. 17 मार्चला दोघांविरुद्ध अजामीन पात्र वारन्ट जारी केले होते. 

दरम्यान, पाच आलिशान गाड्यातून ते कुटुंबातील एकूण 23 सदस्यांसमवेत पर्यटन 8 व 9 एप्रिलला महाबळेश्वरला गेले होते.लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंदी असूनही, वाधवन कुटुंबियांनी गृहविभागातून प्रवासाचे पत्र मिळविले होते. मात्र सीबीआयच्या आरोपींना हे पत्र कसे मिळाले, याची चर्चा केवळ राज्यात नव्हे तर देशभर रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी तातडीने हालचाली करत, वाधवान बंधू आणि त्यांच्यासोबतच्या 23 जणांना पाचगणीत क्वारंटाईन केले होते. त्यानंतर क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सातारा पोलिसांनी वाधवान बंधूंना सीबीआयच्या ताब्यात दिले.

टॅग्स :येस बँकगुन्हा अन्वेषण विभाग