Join us

अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष; ऑनलाइन शिक्षणाची सुविधा नाही, आरटीईतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 17:01 IST

ऑनलाइन शिक्षणाची सुविधा नाही, आरटीईतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर संक्रांत

मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक वाईट परिणाम शिक्षण क्षेत्रावर दिसून आला असून, वर्ष - दीड वर्ष प्रत्यक्षात बंद असलेल्या शाळांमुळे गरीब व वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाला मुकावे लागले. नियमित विद्यार्थ्यांच्या शिक्षणात ऑनलाईन अभ्यासामुळे अनेक अडचणी आल्याच, पण आरटीई अंतर्गत प्रवेशित मुले तर शिक्षण प्रवाहापासून दूरच फेकली गेल्याचे वास्तव समोर आले. शुक्रवारपासून राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी ऑनलाईन शिक्षणाच्या सेवेअभावी यंदाच्या शैक्षणिक वर्षातही अभ्यासापासून दूर राहावे लागत असल्याची भीती विद्यार्थी, पालकांना आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यावर्षी राज्यातील ९ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागांवर ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश लॉटरी पद्धतीने निश्चित करण्यात आले आहेत. कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया काही काळ स्थगित करण्यात आली होती. परंतु, सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आहे. या कालावधीतील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी पालकांची अपेक्षा आहे. गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक साधनसुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्या उपलब्ध करून देण्याबाबत विचार होणे गरजेचे आहे.

टॅग्स :विद्यार्थीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस