Join us  

यंदा स्कूल बसचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 7:55 PM

स्कूल बस मालक संघटनेने जाहीर केले धोरण : दरवाढ शैक्षणिक वर्षांपासून लागू होणार

मुंबई : स्कूल बस मालक संघटनेने महागाईचे कारण पुढे करत स्कूल बसच्या दरात आगामी शैक्षणिक वर्षापासून १० ते १५ टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी मालक संघटनेने जाहीर केलेल्या धोरणातून ही माहिती पुढे आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, डिझेलसह बसचा विमा, कर्मचाऱ्यांचे वेतन, बसचा देखभाल खर्च वाढला आहे. याशिवाय मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बस मालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. तसेच शासनाने सुरक्षेच्या नावाखाली आणलेल्या नव्या नियमावलीमुळेही बस मालकांचे बजेट कोलमडले आहे. परिणामी, २०१९-२० या येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बससाठी १० ते १५ टक्के  दरवाढ केली जाईल. ...तर स्कूल बस सोडणार नाही!मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे स्कूल बस मालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यंदा पावसाळ्यात ज्या मार्गावर खड्डे असतील, त्याठिकाणी स्कूल बस सेवा बंद केली जाईल, असे अनिल गर्ग यांनी सांगितले. खड्ड्यांबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही मार्ग निघत नसल्याने यापुढे पालकांनीच महापालिकेसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.वाहतूक पोलिसांची तक्रार करणारमुंबईत १३ आसनी क्षमतेहून कमी आसन क्षमतेच्या वाहनांना स्कूल बसचा परवाना देऊ नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. तरीही आरटीओकडून परवाना देण्यात येत असून वाहतूक पोलीसही अशा बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे १३ आसन क्षमतेहून कमी आसन क्षमतेच्या वाहनांमधून शाळकरी मुलांची वाहतूक दिसल्यास संबंधिच विभागातील वाहतूक पोलीस आणि आरटीओंविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणार असल्याचे संघटनेने सांगितले.

...तर विद्यार्थ्याचे महिना ३०० रुपये वाचतील!मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर स्कूल बसला टोलमधून सूट देण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. टोलचा भार विद्यार्थ्यांवर पडत असून प्रत्येक विद्यार्थ्याकडून महिन्याला ३०० रुपये अतिरिक्त घ्यावे लागत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे टोलमाफी दिल्यास विद्यार्थ्यांचे महिन्याला तितकेच पैसे वाचतील, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :शाळाशिक्षण