Join us  

देशातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्याचं काय करणार? - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 4:19 PM

जर अमेरिकन सरकार लादेनचा मृतदेह समुद्रात टाकतं तर अशीच कृती याकूब मेननच्या बाबतीत तुम्हाला का सुचली नाही? असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला.

मुंबई - देशातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसेचे रक्तरंजित कपडे आजही जपून ठेवले जातात. अस्थी जपून ठेवल्या जातात. जयंती, पुण्यतिथीच्या माध्यमातून दरवर्षी गांधींच्या फोटोला पुन्हा गोळ्या मारल्या जातात हे तुमचं हिंदुत्व आहे का? याकूब मेननच्या कबरीचं काय करायचं ते केले पाहिजे. त्याचे समर्थन कुणी करणार नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु नथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्यांचं काय? हा प्रश्न संघ, भाजपाला विचारायला पाहिजे असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. 

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, याकूब मेननच्या कबरीवर फुले चढवणे, सजावट करणे हे वाईट आहे. त्याचे समर्थन कुणी करू शकत नाही. याकूब मेननची फाशी आणि त्यावरील अंमलबजावणी भाजपा काळात झाल्या. जर अमेरिकन सरकार लादेनचा मृतदेह समुद्रात टाकतं तर अशीच कृती याकूब मेननच्या बाबतीत तुम्हाला का सुचली नाही? मूळात मृतदेह दफन करण्याची परवानगीच का दिली? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

काय आहे वाद?१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननच्या कबरीवर मार्बल आणि लायटींग लावण्यात आली आहे. मुंबईच्या बडा कब्रिस्तान येथील हा प्रकार आहे. मेननच्या कबरीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर यावरून उद्धव ठाकरे आणि भाजपात यांच्यात वादंग पेटला आहे. याकूब मेननच्या कबरीचं सुशोभिकरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले. या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्यांची नावे समोर आली पाहिजे. हा देशद्रोहाचा प्रकार असून ज्यांनी कुणी सुशोभिकरणासाठी परवानगी दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. 

भाजपाचा उद्धव ठाकरेंवर घणाघातयाबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, याकूब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणासाठी अलिखीत परवानगी महाविकास आघाडी सरकारने दिली. मविआ आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी किती तडजोड केली हे यावरून स्पष्ट झाले आहे. भाजपा या प्रकाराचा तीव्र निषेध करत आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची प्रतिमा खालावली. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सरकारला करण्यात आली आहे. 

तसेच याकूबची कबर सुशोभिकरणासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे नावे समोर आणा. हे देशद्रोही कृत्य असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तत्कालीन सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होते. कट्टर हिंदुत्ववादी स्वत:ला म्हणवणारे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड का केली? याचं स्पष्टीकरण जनतेला दिले पाहिजे. या प्रकारासाठी सरकारमध्ये कोण कोण समाविष्ट होते ते समोर आले पाहिजे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  

टॅग्स :शिवसेनाभाजपानथुराम गोडसे