Join us  

वाह रे आरे; अखेर मेट्रोचे काम थांबले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 4:40 PM

आंदोलकांच्या लढ्याला यश : पर्यावरण संवर्धनाच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे स्वागत

मुंबई : आरे येथे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या वहिल्या भूयारी मेट्रो-३ च्या कारशेडचे काम करण्यात येत होते. मात्र कारशेडविरोधात उभारलेल्या दीर्घ लढ्यानंतर हे काम थांबविण्यात आले होते. त्यानंतर देखील येथे मेट्रोशीसंबंधित कामे सुरू होती. या विरोधातही आवाज उठवल्यानंतर आता ही कामेही थांबविण्यात आली आहेत, अशी माहिती येथील आरे आंदोलकांनी दिली. राज्य सरकारच्या निर्णयाचे आंदोलकांनी स्वागतच केले असून, पर्यावरण संवर्धनसाठी अशी पाऊले उचलावीत, असे मत त्यांनी मांडले आहे.

आरेच्या एकूण जवळपास ३ हजार २०० एकर जागेपैकी ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित करण्याची योजना यापूर्वीच जाहीर झाली आहे. आरे आंदोलकांकडुन प्राप्त माहितीनुसार, राज्य सरकार येथील पर्यावरणाबाबत निर्णय घेत असतानाच कारशेडचे काम थांबविण्यात आले होते. मात्र रॅम्पचे काम सुरु होते. यासही आंदोलकांनी विरोध केला होता. याच काळात सरकारने घेतलेल्या बैठकीत आरेमधील पर्यावरण संवर्धनाचा निर्णय घेण्यात आला. येथील कामासाठी ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, याबाबत प्राधिकरण मात्र पुरेशी माहिती देत नाही. आंदोलकांनी देखील हाच सूर लगावला. मुळात प्राधिकरण याबाबतच ठोस आकडा देत नाही. त्यामुळे आतापर्यंत नक्की किती पैसे खर्च झाला असेल? याबाबत सांगणे कठीण आहे, असेही आंदोलकांनी सांगितले. 

आरेमध्ये मेट्रोच्या कारशेडचे काम केव्हाच थांबले होते. त्यानंतर मेट्रोशी निगडीत उर्वरित कामे सुरु होती. आम्ही याविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर कालांतराने का होईना ही कामे आता बंद झाली आहेत. येथील पर्यावरण संवर्धनासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री घेत असलेले निर्णय उत्तम असून, त्याचे स्वागतच आहे.-झोरु भथेना, आरे आंदोलक

..................................

मेट्रोच्या रॅम्पचे काम येथे सुरु होते. आम्ही सातत्याने आवाज उठवित होतो. त्यानंतर कुठे आता यश आले आहे. राज्य सरकार पुढाकार घेत याबाबतचे निर्णय घेत आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागतच करत आहोत.-अमृता भट्टाचार्य, आरे आंदोलक

 

काय झाले होते- मुंबई महापालिकेतल्या वृक्ष प्राधिकरणाने आरे येथील झाडे तोडण्यास परवानगी दिली.- आरेमध्ये मेट्रो कारशेडच्या बांधणीसाठी २७०० झाडांची कत्तल करण्यात आली.- सामान्य जनतेला आणि पर्यावरणप्रेमींना ही बाब लक्षात येताच जनआंदोलन सुरु केले. 

का हवी मेट्रोमुंबईच्या रेल्वेतून सुमारे ७५ लाख प्रवाशांना रोजचा प्रवास करावा लागतो.३३.५ कि.मी. लांबीचा हा मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वे मधील गर्दी कमी करू शकतो.मुंबई मेट्रो-३ प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रहदारीचे प्रमाण कमी होईल.मुंबई मेट्रो-३ प्रकल्पामुळे सुमारे १६ लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकुलीत डब्यातून प्रवास करणे शक्य होईल. 

कनेक्टमेट्रो-३ ही वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रो २-ब ला जोडली जाईल.मेट्रो-१ ला मरोळ, मेट्रो-६ ला आरे येथे मेट्रो-३ जोडली जाईल.विमानतळाशीदेखील मेट्रो-३ कनेक्ट असेल. 

भुयारी मेट्रोआतापर्यंत १७ टीबीएमच्या मदतीने जवळपास ८५ टक्के भुयारीकरण आणि एकूण ५९ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.सद्यस्थितीनुसार एकूण २ मेट्रो स्थानकांच्या स्टेशन बॉक्सचे काम पूर्ण करण्यात आले आहे.विधानभवन स्थानकाचे ७५.४५ टक्के आणि एम.आय.डी.सी.स्थानकाचे ७८ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.२६ भूमिगत स्थानकांपैकी १९ स्थानके कट अँड कव्हर पद्धतीने बांधली जात आहेत.७ स्थानके एनएटीएम आणि सी अँड सीच्या विविध संयोजनांचा वापर करून बांधली जात आहेत.

 

टॅग्स :मेट्रोआरेमुंबईपर्यावरण