Join us  

सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचे कौतुक करणार का? रोहित पवारांचा रणजीतसिंहांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 4:49 PM

लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातील तिढा न सुटल्याने रणजीतसिंह मोहिते-पाटील हे भाजपावासी झाले.

मुंबई - लोकसभा निवडणूक जाहीर होताच भाजपामधील 'इनकमिंग' वाढल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर, आता शरद पवारांचे विश्वासू सहकारी विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनीही कमळ हाती घेतले आहे. त्यानंतर, शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि रणजीतसिंह मोहिते पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.   लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातील तिढा न सुटल्याने रणजीतसिंह मोहिते-पाटील हे भाजपावासी झाले. त्यामुळे, त्यांचं माढा मतदारसंघाचं तिकीटही पक्कं मानलं जातंय. या फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपावर टीकाही होतेय. परंतु, विजयासाठी नव्या लोकांना संधी द्यावी लागेल, असं सांगत भाजपाचे नेते, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या 'इनकमिंग'चं समर्थन केलं आहे. मात्र, शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी या इनकमिंग उमेदवारांवर टीका केली.  'मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना”, अशी एक नविन योजना आचारसंहितेच्या काळात सुरू केल्याचं सांगत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अर्थातच, रणजीतसिंह यांच्या पक्ष सोडण्यामुळे राष्ट्रवादीचं मोठ नुकसान झालं आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या गटाला चांगलाच सुरुंग लागला आहे. त्यामुळे रोहित पवार यांनीही फेसबुकवरुन आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. 

सत्ताधाऱ्यांकडून गेल्या पाच वर्षात लोकांच्या समस्या सोडवण्यात आलेल्या अपयशाचं कौतुक हेच आयात करण्यात आलेले उमेदवार करणार आहेत का? असा प्रश्न विचारत रोहित यांनी रणजीतसिंह मोहिते पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

“मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना”, अशी एक नविन योजना आचारसंहितेच्या काळात सुरू करण्यात आली आहे. कालपर्यंत असणारी विचारधारा, राजकिय आरोप एका क्षणात नष्ट करत व्यक्तीस पवित्र करण्याची स्कीम, हे या योजनेचं वैशिष्ट.आत्ता मुख्यमंत्रीच म्हणाले आहेत, आगे आगे देखों होता हैं क्या? तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले होते की आम्ही मुलेच नाही तर नातवंडे देखील पळवू. यांच्या या वाक्याचा अर्थ इतकाच की, सर्वसामान्यांच्या प्रश्नांच आम्हाला काहीही घेणदेणं नसून फक्त गटातटाचं राजकारण करत, आम्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी काहीही करु शकतो. या सर्व राजकीय गोंधळात एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला काही प्रश्न पडतात ते म्हणजे,

विकासाच राजकारण फसल्यामुळे, लोकांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यात अयशस्वी ठरल्यानेच सत्ताधारी आत्ता लोकांपुढे गटातटाचं राजकारण अजून तीव्रतेने घेवून जात आहेत का? मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठीच सत्ताधाऱ्यांकडून जाणिवपूर्वक भावनिक राजकारण खेळलं जाणार आहे का? सत्ताधाऱ्यांकडून गेल्या पाच वर्षात लोकांच्या समस्या सोडवण्यात आलेल्या अपयशाचं कौतुक हेच आयात करण्यात आलेले उमेदवार करणार आहेत का? असा प्रश्न विचारत रोहित यांनी रणजीतसिंह मोहिते पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. जर असे असेलच तर मला ठाम विश्वास आहे तो सर्वसामान्य लोकांवर. हे लोकच आता विकासाचं बोला, कामाचं बोला म्हणून प्रचारसभेतच यांना फैलावर घेतील, असे म्हणत रोहित पवार यांनी भाजपात प्रवेश करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकमुख्यमंत्री