Join us  

सव्वालाख कोटींची करचोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 7:58 PM

सरकारची फसवणूक : केंद्रीय वस्तू व सेवाकर आणि उत्पादन शुल्क आयुक्तालयाची कारवाई

नवी मुंबई : बनावट क्रेडिट नोटच्या साहाय्याने खासगी कंपनीने शासनाची कोट्यवधी रुपयांची करचोरी केल्याचे उघड झाले आहे. आयात माल व क्रेडिट नोट यातील तफावत निदर्शनास आल्याने केंद्रीय वस्तू व सेवाकर तथा केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तालयाने ही कारवाई केली आहे. त्यानुसार एक लाख 12 हजार 396 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आले असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

महापे येथील प्रोटेक इंजिनीअर्स अॅण्ड फॅब्रिकेशन या कंपनीवर ही कारवाई करण्यात आली आहे. सदर कंपनीकडून होणाऱ्या मालाच्या आयातीच्या व क्रेडिट नोटच्या व्यवहारावर केंद्रीय वस्तू व सेवाकर तथा उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची नजर होती. सदर विभागाचे आयुक्त राजेश कुमार मिश्र, उपआयुक्त दीपक देवरानी, निरीक्षक अरविंद सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली  पथकाकडून संगणकीय माहिती तपासली जात होती. या वेळी जुलै 2017 ते मार्च 2018 दरम्यानच्या जीएसटीआर 3 बी रिटर्न व जीएसटीआर 2 ए रिटर्न यात प्रचंड तफावत आढळून आली. यानुसार पथकाने मंगळवारी कंपनीवर छापा टाकून तिथल्या व्यवहाराची माहिती तपासली. या वेळी प्रत्यक्षात मालाची झालेली खरेदी व बिलापोटी काढलेल्या एक लाख 12 हजार 396.51 कोटी रुपयांच्या क्रेडिट नोट बनावट असल्याचे आढळून आले. याबाबत चौकशीत चुकीने या क्रेडिट नोट निघाल्याचे कंपनीचे संचालक मंजुनाथ अगडी यांनी सांगितले. मात्र, त्याची माहिती केंद्राच्या वस्तू व सेवाकर विभागाला देण्याऐवजी राज्याला कळवण्यात आलेली होती. शिवाय, त्यापैकी काही रकमेचा वापरही करण्यात आलेला होता, त्यामुळे ही चूक जाणीवपूर्वक झाल्याचा तपास पथकाला संशय आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

तज्ज्ञाच्या मदतीने या क्रेडिट नोट रद्द करून संपूर्ण रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :जीएसटीकरनवी मुंबई