विलेपार्ल्यात जैन मंदिराच्या जागेत झाली पूजाअर्चा; तोडक कारवाईवर तीव्र पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 06:30 IST2025-04-21T06:29:19+5:302025-04-21T06:30:19+5:30

मंदिरावर कारवाई करताना, मंदिराच्या मागे दोन महिन्यांपूर्वी अनधिकृत उभी राहिलेली एकमजली इमारत पालिकेला दिसली नाही का? असा सवालही त्यांनी केला

Worship was held at the Jain temple site in Vileparle; Strong backlash against the crackdown | विलेपार्ल्यात जैन मंदिराच्या जागेत झाली पूजाअर्चा; तोडक कारवाईवर तीव्र पडसाद

विलेपार्ल्यात जैन मंदिराच्या जागेत झाली पूजाअर्चा; तोडक कारवाईवर तीव्र पडसाद

मुंबई - विलेपार्ले पूर्व येथील कदम वाडीतील जैन मंदिरावर महापालिकेने १६ एप्रिल रोजी पाडकाम केल्यानंतर शनिवारी या  घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तेथील जागेत पूजाअर्चा करायला परवानगी दिली. त्यानुसार रविवारी सकाळी दिगंबर महाराज सुयश सागर यांनी एक तास पूजाअर्चा केल्याची माहिती पार्श्वनाथ दिगंबर ट्रस्टचे सचिव अनिल बंडी यांनी लोकमतला दिली. पालिका आयुक्तांनी दिलेल्या परवानगीनुसार मंदिराचा ६० टक्के मलबा काढण्यात आला आहे, तर अजून ४० टक्के मलबा काढणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘लोकमत’च्या प्रतिनिधीने सदर जागेला भेट दिली असता प्रमुख पदाधिकारी, महिला आणि तरुण कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. तसेच पोलिस बंदोबस्त होता.
मंदिराची जागा ट्रस्टच्या नावावर करण्याच्या आणि या जागेत मंदिर बांधण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी सोमवारी पालिका आयुक्त गगराणी यांची भेट घेणार आहेत, तर उद्या दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी भेट देण्याची शक्यता बंडी यांनी व्यक्त केली. तसेच लवकरच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कारवाईवेळी २०० पोलिस

पालिकेच्या के पूर्व विभागाने १५० पुरुष, ५० महिला पोलिसांच्या ताफ्यासह एका व्यावसायिकाच्या सांगण्यावरून सहायक आयुक्त नवनाथ घाडगे यांनी जैन मंदिरावर कारवाई केल्याचा आरोप येथील पार्श्वनाथ जैन मंदिराचे सचिव अनिल बंडी यांनी केला. मंदिरावर कारवाई करताना, मंदिराच्या मागे दोन महिन्यांपूर्वी अनधिकृत उभी राहिलेली एकमजली इमारत पालिकेला दिसली नाही का? असा सवालही त्यांनी केला. पालिकेच्या कारवाईत मंदिरातील काही साहित्याची मोडतोड झाल्याचेही त्यांनी सांगितले.

‘जैन मंदिराचे पुनर्वसन करा अथवा भरपाई द्या’

९० वर्षे जुन्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे पुनर्वसन पालिकेने करून द्यावे अथवा भरपाई द्यावी अशी मागणी ‘वॉच डॉग’ या सामाजिक संस्थेने केली आहे. हे मंदिर बेकायदा असल्याचे कारण देऊन ते पाडल्याबद्दल वॉच डॉग संस्थेने निषेध केला आहे. सुमारे शतकभरापासून उभे असलेले हे मंदिर जैन समुदायाचे एक पवित्र श्रद्धास्थान होते. श्रद्धा आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या मंदिरावर पालिकेने असंवेदनशीलतेने बुलडोझर चालवला, असा आरोप वॉच डॉगचे निकोलस अल्मेडा यांनी केला आहे. के पूर्व वॉर्डमधील बेकायदा बांधकामे अबाधित आणि संरक्षित आहेत. पैशांची वसुली करून त्यांना संरक्षण दिले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

Web Title: Worship was held at the Jain temple site in Vileparle; Strong backlash against the crackdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.