वरळीला मिळणार आता आंतरराष्ट्रीय दर्जा; आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला झुकते माप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 12:06 AM2020-03-07T00:06:57+5:302020-03-07T06:59:44+5:30

मुंबईसाठी अशा विविध तरतुदी असल्या तरी युवासेना प्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा प्रभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Worli will now receive international status; Aditya Thackeray's inclination towards tourism | वरळीला मिळणार आता आंतरराष्ट्रीय दर्जा; आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला झुकते माप

वरळीला मिळणार आता आंतरराष्ट्रीय दर्जा; आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला झुकते माप

Next

मुंबई : महाविकास आघाडीच्या पहिल्याच पूर्ण अर्थसंकल्पात मुंबईला काहीसे झुकते माप मिळाले आहे. वरळी येथील आरेच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल, वडाळा येथे जीएसटी भवन, कुलाबा जेट्टीचा विकास, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि मणी भवनसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मुंबईसाठी अशा विविध तरतुदी असल्या तरी युवासेना प्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा प्रभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत सर्वाधिक निधी हा पर्यटनाच्या वाटेने येणार आहे. वरळी येथील १४ एकर जागेवर जागतिक दर्जाचे पर्यटन संकुल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक स्तरावरील पर्यटन सल्लागाराची नेमणूक करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. यात जागतिक दर्जाचे आकर्षक मत्स्यालय असणार असून या प्रकल्पाची किंमत साधारण एक हजार कोटी असणार आहे. याशिवाय, मुंबईतील पर्यटन विकासासाठी २०१९-२० मध्ये शंभर कोटींची तरतूद करण्यात आली होती. यापुढेही दरवर्षी शंभर कोटींप्रमाणे पाच वर्षांसाठी ५०० कोटींचा निधी मिळणार आहे. याशिवाय, हाजी अली परिसराच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे.
मुंबईत वडाळा येथे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भवन उभारण्यात येणार आहे. जीएसटी भवन, अप्रत्यक्ष कर संशोधन संस्था आणि लेखा व कोषागरे विभागाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी हे भवन असणार आहे. यासाठी ११८.१६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईत राज्य उत्पादन शुल्क भवन बांधण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आगामी आर्थिक वर्षात १७.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच, मुंबईतील रो-रो वाहतुकीअंतर्गत कुलाबा जेट्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपये आजच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहेत. सागरमाला कार्यक्रमांतर्गत प्रवासी जलवाहतुकीसाठी रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिसरातील वसई, भार्इंदर, घोडबंदर, बोरीवली, गोराई यासह दहा ठिकाणी रो-रो सेवेसाठी जेट्टी उभारण्यात येणार असून त्यासाठी ६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयास १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या संग्रहालयातील दुर्मीळ ग्रंथ व हस्तलिखितांच्या डिजिटायझेशनसाठी ५ कोटींचे विशेष अनुदान देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. याशिवाय, मुंबईतील एशियाटिक सोसायटीलादेखील हे विशेष अनुदान दिले जाणार आहे. महात्मा गांधी यांनी वास्तव्य केलेल्या मणीभवन या वास्तू आणि संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या आर्थिक वर्षांत २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
आगामी वर्षात राज्यातील मेट्रोसाठी या अर्थसंकल्पात १ हजार ६५७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर, शासकीय मुद्रणालयाच्या आधुनिकीकरणासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्कात १ टक्का कपातीचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याचाही लाभ मुंबईकरांना होणार आहे़

Web Title: Worli will now receive international status; Aditya Thackeray's inclination towards tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.