Join us

रस्त्याखाली काम, रस्त्यावर ‘जाम’! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 07:57 IST

वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार? वरळी नाक्यावर मेट्रोच्या कामासाठी रस्ता बंद केला आहे, पण तिथे काम करताना कुणीच कामगार दिसत नाहीत, असे ‘लोकमत’च्या निदर्शनास आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या भुयारी मेट्रो अर्थात मुंबई मेट्रो-३ चा संपूर्ण टप्पा बुधवारी सुरू होणार आहे. त्यात आरे ते कफ परेड असा प्रवास करणे मुंबईकरांना सहज शक्य होणार आहे. पण या मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक स्थानकाचे काम मेट्रो सुरू होऊनही पूर्ण झालेले नाही. या अर्धवट कामाचा फटका रस्ते वाहतुकीला बसत आहे. आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) ते मुंबई महानगरपालिका यानगृह बसस्टॉपपर्यंत सध्या वाहतुकीसाठी एकच लेन सुरू आहे. त्यामुळे ‘रस्त्याखाली काम, पण रस्त्यावर ट्रॅफिक जॅम’, असे चित्र वरळी नाक्यावर रोज पाहायला मिळते. 

मुंबई मेट्रो-३ चा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी नाका हा दुसरा टप्पा ९ मे २०२५ रोजी सुरू झाला. त्यात आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) स्थानकाच्या ६ पैकी सध्या दोनच एन्ट्री आणि एक्झिट मार्ग सुरू आहेत तर उर्वरित चार एन्ट्री आणि एक्झिटचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या कामामुळे रस्त्याची एक बाजू खोदून ठेवली आहे तर एका लेनवरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रहदारीच्या वेळी या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यात रस्त्याच्या कामामुळे या ठिकाणी सखल भाग झाल्यामुळे पावसाळ्यात पाणीही साचले होते.

‘एमएमआरसी’चे म्हणणे...मुंबई मेट्रो मार्ग- ३ चे आचार्च अत्रे चौक स्थानकाचे स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. सध्या ६ पैकी २ प्रवेश-निर्गमन (ए ४ व बी ५) नागरिकांच्या वापरासाठी खुले आहेत तर उर्वरित प्रवेश-निर्गमनांवरील स्थापत्य काम पूर्ण झाले असून लिफ्ट व एस्कलेटरसारख्या प्रणालींचे काम प्रगतिपथावर आहे. ए १ व ए २ समोरील रस्त्याचे भराव काम पावसाळ्यात काही काळ बाधित झाले होते. हे काम आता पुन्हा सुरू करण्यात आले असून डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होऊन नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून दिले जाईल, असे ‘एमएमआरसी’ने स्पष्ट केले आहे. 

डिसेंबरशिवाय सुटका नाही !वरळी नाक्यावर मेट्रोच्या कामासाठी रस्ता बंद केला आहे, पण तिथे काम करताना कुणीच कामगार दिसत नाहीत, असे ‘लोकमत’च्या निदर्शनास आले. वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या वेळी आम्ही या ठिकाणी पाहणी केली. तेव्हा, रस्त्याखाली काम सुरू असल्याचे दिसले. डोगस -सोमा जेव्ही कंपनी या मेट्रो स्थानकाचे काम करत आहे. जोपर्यंत रस्त्याखालील काम पूर्ण होत नाही, तोवर रस्त्यावरचे काम करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनशी (एमएमआरसी) संपर्क साधला. त्यांचे उत्तर पाहता, डिसेंबरपूर्वी रस्त्याचे काम मार्गी लागणे कठीण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Metro Opens, Traffic Jams Remain: Work Underway Causes Road Congestion

Web Summary : Despite the new Mumbai Metro line, incomplete station work at Acharya Atre Chowk causes traffic jams. Only one lane is open, leading to congestion. Completion is expected by December 2025, according to MMRC.
टॅग्स :मेट्रो