वरळी किल्ला उजळला, पुन्हा प्रकाशाचे तोरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:05 IST2025-04-02T13:04:34+5:302025-04-02T13:05:10+5:30
Mumbai: ऐतिहासिक वास्तू असलेला वरळीचा किल्ला पुन्हा एकदा प्रकाशाने उजळला आहे. याबाबत ‘लोकमत’ने १८ फेब्रुवारीला किल्ल्यावरील चोरीला गेलेल्या आणि नादुरुस्त दिव्यांचे वृत्त दिले होते. त्यानंतर पालिकेने कार्यवाही केल्याने हा किल्ला पुन्हा झळाळून निघाला आहे.

वरळी किल्ला उजळला, पुन्हा प्रकाशाचे तोरण
मुंबई - ऐतिहासिक वास्तू असलेला वरळीचा किल्ला पुन्हा एकदा प्रकाशाने उजळला आहे. याबाबत ‘लोकमत’ने १८ फेब्रुवारीला किल्ल्यावरील चोरीला गेलेल्या आणि नादुरुस्त दिव्यांचे वृत्त दिले होते. त्यानंतर पालिकेने कार्यवाही केल्याने हा किल्ला पुन्हा झळाळून निघाला आहे. आता स्थानिक रहिवाशी आणि पर्यटकांसाठी हा किल्ला पर्वणी ठरणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
जहाजांवार नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी १९६७ मध्ये बांधलेल्या या किल्ल्याचे पालिकेने दोन वर्षांपूर्वी दोन कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण केले होते. त्यावेळी येथील अनधिकृत बांधकामे हटवण्यासोबतच किल्ल्यावर बेसॉल्ट वॉकवे आणि रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या किल्ल्यावर लावलेल्या १६५ दिव्यांपैकी शंभराहून अनेक दिवे चोरीला गेले आणि फक्त ४७ दिवे शिल्लक होते. नादुरुस्त दिवे बंगळुरू येथे पाठवून त्यांची दुरुस्ती करण्यात आली.
दिव्यांना लोखंडी ग्रीलचे संरक्षण
गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथे पालिकेकडून ६७ दिवे लावण्यात आले आहेत. रंगीबेरंगी दिवे न लावता एकाच प्रकारचे दिवे लावण्यात आले असून हे दिवे चोरीला जावू नयेत यासाठी त्यांना लोखंडी ग्रीलचे संरक्षणही देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
आता नागरिक आणि पर्यटकांनी जबाबदारीने वागून हे दिवे नादुरुस्त होणार नाहीत अथवा चोरीला जाणार नाहीत यासाठी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. वरळी किल्ल्यासारख्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन केल्यास त्याचे महत्त्व पुढील पिढीला कळेल, असे मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केले.