Join us  

महिला दिन विशेष : पार्ट टाइम काम करून शिक्षिका रेटताहेत संसार गाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 5:17 AM

चाळिशी ओलांडल्यामुळे दुसऱ्या नोकरीचे मार्गही बंद

ठळक मुद्देसन २००० पासून विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळालेल्या शाळांतील सुमारे ६० हजार शिक्षक अनुदानाच्या मागणीसाठी संघर्ष करीत आहेत. यात सुमारे १२ हजार महिला शिक्षिकांचा समावेश आहे

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना विद्यादानाचे काम आणि उर्वरित वेळेत मिळेल ते पार्ट टाइम काम करून आलेल्या पैशातून संसाराचा गाडा हाकण्याची वेळ राज्यातील विनाअनुदानित शाळांतील तब्बल १२ हजार महिला शिक्षकांवर आली आहे. आज ना उद्या अनुदान मिळेल या आशेवर त्यांनी आता चाळिशीही ओलांडली आहे. एका महिलेकडे राज्याचे शिक्षणमंत्रिपद असताना याच राज्यातील विनाअनुदानित महिला शिक्षकांना भविष्याची चिंता आता सतावत असून, एक-एक दिवस त्या आशेवर काढत आहेत.

सन २००० पासून विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळालेल्या शाळांतील सुमारे ६० हजार शिक्षक अनुदानाच्या मागणीसाठी संघर्ष करीत आहेत. यात सुमारे १२ हजार महिला शिक्षिकांचा समावेश आहे. अनुदान नसल्यामुळे या शाळांतील शिक्षकांना विविध कामे करावी लागत आहेत. काहींनी चहा टपरी टाकली आहे. कुणी हॉटेलमध्ये वेटर आहे. कुणी शेतमजुरी करतो. कुणी भाजीपाला विकतो, खाजगी शिकवण्या घेतो, ट्रॅक्टर चालवतो, रात्रपाळी करून शिक्षक पोट भरत आहेत. तर महिला शिक्षकही टेलरिंग, ब्युटीपार्लर तसेच अन्य काम करीत संसाराला हातभार लावत आहेत. महिला दिन साजरा होत असला तरी न्याय्य मागण्यांसाठी या महिला शिक्षकांनी पुन्हा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. आता दुसरी नोकरी लागण्याची वेळ निघून गेल्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा, याची चिंता या महिला शिक्षकांना सतावत आहे.

विनाअनुदानित शाळेतील शिक्षिक आजही अनुदान मिळेल या आशेवर कामावर जात आहेत. यामध्ये १२ हजारांवर शिक्षिकांचा समावेश आहे. मात्र, सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मुंबईतील आझाद मैदानावर ३८ दिवस आंदोलन केले. कोरोनाच्या नावावर सरकारने आंदोलनही हुसकावले. आता न्याय मागायचा कुठे?- नेहा गवळी, महिला अध्यक्ष, शिक्षक समन्वय संघ, महाराष्ट्र राज्य

 

टॅग्स :शिक्षकजागतिक महिला दिन