मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क: मुंबई-पालिकेच्या निवडणूका लवकर होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई महानगर पालिकेत भाजपाचा महापौर विराजमान होण्यासाठी उत्तर मुंबईच्या भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे, आवाहन मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी काल रात्री कांदिवलीत दिले.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, भारतीय जनता पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात 'तिरंगा यात्रा' आणि शूर सैनिकांसाठी सत्कार कार्यक्रम आयोजित करून भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्य आणि धैर्याचा उत्सव साजरा करत आहे. त्याच अनुषंगाने, उत्तर मुंबई भाजपनेही तिरंगा यात्रा आयोजित केली होती.त्यानंतर उत्तर मुंबई भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक उर्फ बाळा तावडे यांच्या पदग्रहण सोहळ्यात मंत्री शेलार बोलत होते.
उत्तर मुंबई भाजपची तिरंगा यात्रा कांदिवली-पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गच्या अदानी इलेक्ट्रिक हाऊस कार्यालयापासून सुरू झाली.आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि खासदार पियुष गोयल यांच्या येथील लोककल्याण कार्यालयात मेळाव्यात रूपांतरित झाली.
यावेळी उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाळा तावडे आणि माजी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर,मुंबई भाजप सचिव विनोद शेलार तसेच उत्तर मुंबई भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.