ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमवर कार्यकर्त्यांचाही वॉच; राष्ट्रवादी काँग्रेसने बसवले जिंतूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 10:49 IST2025-12-08T10:49:30+5:302025-12-08T10:49:59+5:30
मालवण (जि. सिंधुदुर्ग) पालिका निवडणुकीतील मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँग रूमचा एक सीसीटीव्ही कॅमेरा ब्लॅक आउट झाल्याची तक्रार उद्धवसेनेच्यावतीने करण्यात आली.

ईव्हीएमच्या स्ट्राँगरूमवर कार्यकर्त्यांचाही वॉच; राष्ट्रवादी काँग्रेसने बसवले जिंतूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
मुंबई : राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या असून, मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँग रूमला सशस्त्र पोलिस बंदोबस्त असताना उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधीही त्यावर वॉच ठेवून आहेत. जिंतूर (जि. परभणी) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वखर्चाने स्ट्राँग रूमबाहेर सीसीटीव्ही बसवले आहेत. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, निकालात छेडछाड झाल्याची शंका निर्माण होऊ नये, या हेतूने पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.
मालवण (जि. सिंधुदुर्ग) पालिका निवडणुकीतील मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँग रूमचा एक सीसीटीव्ही कॅमेरा ब्लॅक आउट झाल्याची तक्रार उद्धवसेनेच्यावतीने करण्यात आली.
हार्ड डिस्क बदलली
संगमनेर (जि. अहिल्यानगर) नगरपरिषदेच्या निवडणुकीतील ईव्हीएम ठेवलेल्या थोरात क्रीडा संकुलातील सीसीटीव्ही कॅमेरे रविवारी बंद पडल्याची चर्चा होती. त्यामुळे त्याठिकाणी उमेदवारांसह नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे, अरुण उंडे यांनी सांगितले
की, हार्ड डिस्क ड्राइव्ह भरल्याने ती बदलण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या प्रक्रियेचे पूर्णपणे चित्रीकरण केले आहे. येथे १२ सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास सुरू आहेत.
शहाद्यात महिला उमेदवारावर गुन्हा
शहादा (जि. नंदुरबार) :येथील स्ट्राँग रूमचे सील निघाले आहे, तसेच छेडखानी झाली आहे, अशी अफवा पसरवून संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी सीमा परवीन साजीद अन्सारी या महिला उमेदवारविरुध्द गुन्हा दाखल झाला.