Join us  

अखेर मुहुर्त मिळाला, 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार शिवस्मारकाचे काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 7:42 PM

मुंबईजवळील समुद्रात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीच्या कामास अखेर मुहुर्त मिळाला आहे.

मुंबई - मुंबईजवळील समुद्रात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीच्या कामास अखेर मुहुर्त मिळाला आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या उभारणीच्या प्रत्यक्ष कामास येत्या 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली आहे. शिवस्मारकाच्या उभारणीच्या कामास 19 ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारने दिले होते. आता 24 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, असे मेटे यांनी सांगितले. तसेच शिवस्मारकासाठीच्या अपेक्षित खर्चामध्ये 643 कोटींनी वाढ झाल्याचेही मेटे यांनी सांगितले.  मुंबईलगत अरबी समुद्रात असलेली शिवस्मारकासाठीची जागा राजभवनापासून १.२ किमी, गिरगांव चौपाटीपासून ३.६ किमी तर नरिमन पॉर्इंटपासून २.६ किमी समुद्रात आहे. समुद्रातील ६.८ हेल्टरच्या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.  अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कंत्राट लार्सन अँड टुब्रो कंपनीला देण्यात आले आहे. लार्सन आणि टुब्रोला शिवस्मारकाच्या उभारणीचे काम सोपवताना पुढील 36 महिन्यांत स्मारक उभारणीचे काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. मात्र विविध परवानग्या मिळाल्या नसल्याने प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब झाला आहे. 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजमुंबईमहाराष्ट्र सरकारविनायक मेटे