Join us

क्यू आर कोडपासचे काम वेगात सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 19:07 IST

पुढील आठवड्यात पासची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता

 

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १५ जूनपासून निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु झाली आहे. मात्र एक महिना उलटत आला तरी, कर्मचाऱ्यांना क्यू आर कोड पास मिळाला नाही. कार्यालयीन वेळा सारख्या असल्याने गर्दीचे नियोजन, फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करणे, अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मध्य, पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे क्यू आर कोड पासचे काम वेगात सुरु आहे. पुढील आठवड्यात पासची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. क्यू आर कोड पास मिळाल्यास कर्मचाऱ्यांची पटकन ओळख पटण्यास आणि गर्दीचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लाेकल सुरु झाली. सध्या दोन्ही मार्गावर एकूण ७०२ फेऱ्या धावत आहेत. मात्र लोकल सुरु करण्याअगोदरच रेल्वेने राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना क्यु आर काेड असलेले कार्ड देण्याची अट घातली हाेती. मात्र, लोकल सेवा सुरु होऊन एक महिना झाला. तरी, कर्मचाऱ्यांना क्यु आर काेडचे पास देण्यात आले नाहीत.

पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्येत वाढ हाेत आहे. त्यामुळे गर्दीचे नियाेजन करणे, लाेकल-रेल्वे स्थानकांमध्ये फिजिकल  डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी पश्चिम रेल्वेने आता क्यु आर काेडच्या पासची सक्ती केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांकडे क्यु आर काेडचा पास नसेल. त्यांना रेल्वे स्थानक आणि लाेकलमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. त्यांच्याकडून दंड देखील आकारण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने आपल्या रेल्वे स्थानकात तशा उदघाेषणा करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम रेल्वेने २० जुलैपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लाेकल प्रवासासाठी क्यु आर काेडच्या पासची सक्ती करण्याची शक्यता आहे. तर, मध्य रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर क्यु आर काेड पास अंमलात आणणार आहे.

................................

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लाेकल प्रवासासाठी क्यु आर काेडचे पास देण्याचे काम राज्य सरकार, महापालिका आणि पाेलिस विभागाकंडून सुरु आहे. सर्व कर्मचाऱ्यांचा तपशील, माहिती एकत्र केली जात आहे. २० जुलैच्या आधी क्यू आर पास तयार होणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात हे काम पुर्ण हाेण्याची शक्यता आहे. या क्यु आर काेडच्या पासमुळे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा कळणार, त्यानुसार लाेकलमधील गर्दीचे नियाेजन करण्यासाठी कामाच्या वेळा बदलण्यास मदत हाेणार आहे.  क्यु आर काेडच्या पास हे कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन आेळखपत्राशी संलग्न केले जाणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आेळख पटकन हाेणार आहे. क्यु आर काेडचे पास रंगीत असल्यामुळे तिकिट तपासणीस कमी वेळात ते तपासु शकतील. कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश करताना तैनात असलेल्या टीसी, जीआरपी, आरपीएफ जवानांना आपल्या क्यु आर काेड दाखवायचा आहे. रेल्वे कर्मचारी मोबाइलद्वारे पास स्कॅन करेल.

 

 

 

क्यू आर कोड पासची प्रक्रिया सुरु आहे. २० जुलैपर्यंत क्यू आर कोड पास तयार करण्याचे अंतिम लक्ष्य ठरविण्यात आले आहे.

- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

 

राज्य सरकार क्यू आर कोडवर काम करीत आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी राज्य सरकारसाेबत संपर्कात आहेत. लवकरात लवकर क्यु आर काेडचे पास वितरित करण्यात येणार आहे.

- शिवाजी सुतार,मुख्य जनसंपर्क अधिकारी,मध्य रेल्वे

टॅग्स :लोकलमुंबई लोकलकोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉक