चर्नी रोड येथील केळेवाडी पादचारी पुलाचे काम रखडले; सैफी रुग्णालयाबाहेर नागरिकांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:29 IST2025-12-17T13:27:12+5:302025-12-17T13:29:03+5:30
चर्नी रोड स्थानकाबाहेरील महर्षी कर्वे मार्ग ओलांडून सैफी रुग्णालयासमोर उतरणाऱ्या केळेवाडी पादचारी पुलाचे काम रखडल्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

चर्नी रोड येथील केळेवाडी पादचारी पुलाचे काम रखडले; सैफी रुग्णालयाबाहेर नागरिकांचे आंदोलन
मुंबई : चर्नी रोड स्थानकाबाहेरील महर्षी कर्वे मार्ग ओलांडून सैफी रुग्णालयासमोर उतरणाऱ्या केळेवाडी पादचारी पुलाचे काम रखडल्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सोमवारी सायंकाळी नागरिकांसह आंदोलनात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले होते. पुलाचे ६० टक्के काम रखडले असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या पुलाच्या बांधकामाला सैफी रुग्णालयाने नोव्हेंबर २०२४ मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने संबंधित पुलामुळे संभाव्य अडचर्णीची माहिती न्यायालयाला दिली होती. त्यावर न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन पुलाच्या बांधकामाला स्थगिती दिली. मात्र, नंतर रुग्णालय प्रशासन आणि महापालिका यांच्या एकमताने आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पूल बांधण्यास सुरुवात झाली. मात्र, बांधकाम सुरू झाल्यांनतर ते अध्र्थ्यांवरच थांबवण्यात आले ते अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. हे काम सैफी रुग्णालय प्रशासनानेच बंद पाडल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. याबाबत मंत्री लोढा आणि पालिका अधिकाऱ्यांमधील बैठक निष्फळ ठरल्यानंतर अखेर रहिवाशांनी सैफी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले.
सकारात्मक निर्णय न झाल्यास उपोषण
सैफी रुग्णालयाच्या विश्वस्तांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि पुलाच्या बांधकामात रुग्णालय प्रशासन अडथळा निर्माण करीत नसल्याचे सांगितले. १९ डिसेंबरला रुग्णालयाचे विश्वस्त, पालिका, रहिवासी यांच्यात बैठक होणार आहे. त्यात सकारात्मक निर्णय न झाल्यास उपोषणाला बसण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.
गिरगावात जाण्यासाठी पूल महत्त्वाचा
महर्षी कर्वे मार्गावर साहित्य संघ मंदिर, केळेवाडी पूल म्हणून ओळखला जाणारा सुमारे ८० ते १०० वर्षे जुना पादचारी पूल थोकादायक ठरल्याने चार वर्षापूर्वी पाडण्यात आला. चनीं रोड रेल्वेस्थानकालगत असलेल्या या पादचारी पुलावरून गिरगावात जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग होता. पूल नसल्याने गिरगावात जाणारे प्रवासी व नागरिकांना महर्षी कर्वे रोड मार्ग ओलांडून जावा लागत असून अपघाताची भीतीही आहे.