मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) राबविण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पांसह ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पांसाठी ‘एमएमआरडीए’ला ८०३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे निधीची टंचाई काही अंशी दूर होणार आहे.‘एमएमआरडीए’तर्फे मुंबई महानगरात ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारले जाणार आहे. त्यातील काही प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत. या प्रकल्पांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. त्याकरिता राज्य सरकारकडून या प्रकल्पांसाठी दुय्यम कर्ज ‘एमएमआरडीए’ला दिले जाणार आहे. मेट्रोच्या विस्तारामुळे मुंबई शहराचा कायापालट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुद्रांक शुल्काचे २९१ कोटी जमा राज्यातील नागरी परिवहन प्रकल्पांसाठी राज्य सरकार स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्रीवर अतिरिक्त एक टक्का अधिभार लावते. त्यातून जमा झालेला निधी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामासाठी दिला जातो. त्यातील मुद्रांक शुल्कातून जमा झालेला २९१ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने ‘एमएमआरडीए’ला दिला आहे. त्यामुळे आता ‘एमएमआरडीए’च्या प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार आहे.
... या प्रकल्पांच्या कामासाठी निधी
प्रकल्प आणि प्राप्त निधी (कोटी रुपये)ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगदा ६८ ठाणे-कल्याण-भिवंडी (मेट्रो ५) ५२.३८ स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (मेट्रो ६) ३२.९५ डी. एन. नगर ते मंडाळे (मेट्रो २ बी) ११२.८ वडाळा ते कासारवडवली (मेट्रो ४) ७८.५२ कासारवडवली ते गायमुख (मेट्रो ४ अ) १३.२ मिरा-भाईंदर ते दहिसर (मेट्रो ९) ६६.७१ गायमुख ते शिवाजी चौक (मेट्रो १०) ८६.१४ कल्याण ते तळोजा (मेट्रो १२) १.०९
भुयारी मेट्रोसाठी ५१२ कोटी रुपयांचे दुय्यम कर्ज मुंबई शहरासह महानगरात कामे सुरू असलेल्या ८ मेट्रो मार्गिका आणि ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गासाठी दुय्यम कर्ज म्हणून एकूण ५१२ कोटी रुपयांचा निधी सरकारने दिला आहे.