अन्याया विरुद्ध लढण्याचे काम शिवसेनेची महिला सेना करते, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By मनोहर कुंभेजकर | Published: March 10, 2024 01:47 PM2024-03-10T13:47:12+5:302024-03-10T13:47:32+5:30

महिला समाजाला आधार देण्याचे कार्य करत असतात. त्यांच्यात समाजात क्रांती घडवून आणण्याची ताकद आहे. महिलांकडे एक त्यागाचे प्रतीक म्हणून देखील पाहिले जाते.

Women's Sena of Shiv Sena works to fight against injustice, for the empowerment of women: | अन्याया विरुद्ध लढण्याचे काम शिवसेनेची महिला सेना करते, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अन्याया विरुद्ध लढण्याचे काम शिवसेनेची महिला सेना करते, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महिला समाजाला आधार देण्याचे कार्य करत असतात. त्यांच्यात समाजात क्रांती घडवून आणण्याची ताकद आहे. महिलांकडे एक त्यागाचे प्रतीक म्हणून देखील पाहिले जाते. अन्याया विरुद्ध लढण्याचे काम, ज्याच्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेना महिला सेना करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

आज शिवसेना महिला सेनेच्या वतीने शिवदुर्गा महिला संमेलनाचे आयोजन काल रात्री षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या मीना कांबळी, सर्व महिला उपनेत्या सचिव व आ. मनीषा कायंदे, ठाण्याच्या माज़ी महापौर मीनाक्षी शिंदे आदी मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये, महिला बचत गट, लेक लाडकी, लखपती योजना, बस प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, महिला बचत गटांना सक्षम भांडवल उभा करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले आहेत, यामध्ये पंधरा हजारावरून तीस हजार रुपये रक्कम करण्यात आली आहे यांसह अनेक निर्णय राज्य सरकारने महिलांच्या हिताच्या दृष्टीने राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले.  

आपलं सरकार हे सर्वसमान्यांच सरकार असून ते सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या आधीच्या सरकारमध्ये सण, उत्सव या सर्वांवर बंदी घालण्यात आली होती. आपलं सरकार आल्यानंतर सर्व सण उत्सवावर असलेली बंदी उठवून टाकण्यात आली. आपली संस्कृती जोपासणे, वाढवणे हे आपलं कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देखील महिलांसाठी अनेक योजना राबवत महिलांना सक्षम करण्याचे काम केले आहे. यामध्ये उज्वला योजना, बेटी बचाव बेटी पढाव यासोबतच महिलांच्या नावावर घर असल्यास टॅक्समध्ये सवलत देण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशा प्रकारची योजना राबविण्यात येत आहे. जवळपास तीन कोटीपेक्षा अधिक महिलांना त्याचा फायदा झाला असल्यास त्यांनी सांगितले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले विमा योजनेची पाच लाखापर्यंत मर्यादा वाढवण्यात आली यामधील अटी शर्ती काढून टाकल्याने त्याचा सर्वांना फायदा घेता येणार आहे हा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. नुकतेच राज्य सरकारने महिला धोरण जाहीर केले आहे यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक भरीव कार्य होणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. 

सरकारने घेतलेले निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शिवसेना महिला आघाडीने केले पाहिजे तसेच शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेऊन जनतेचा सरकार दरबारी होणाऱ्या फेऱ्या थांबवण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जवळपास चार कोटी लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आला असून त्या मार्फत लोकांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याचे कार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, शिवदुर्गा महिला मेळाव्याचा संकल्प असा आहे की, “दिल्ली मुंबईत आमचं तोरण हेच आमचे महिला धोरण” यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परत एकदा मुख्यमंत्री आपल्याला करायचे आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक महिलेत शिवदुर्गा संचारावी अशा प्रकारची ही संकल्पना घेतलेली असल्याचे त्यांनी नमूद केले. 

काल आठ मार्चला महिला धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं, त्याच्यात म्हटलेले आहे की महिलांमध्ये गुंतवणूक करा आणि प्रगतीला वेग द्या, महिलांच्यासाठी म्हणून अनेक योजनांची माहिती मुख्यमंत्री कक्षाकडून वेळोवेळी दिली जात आहे. अनेक योजना सरकार राबवत आहे मात्र त्या योजना कशा प्रकारे राबवायच्या या संदर्भात या मेळाव्यातून महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच महिला मतदारांना कामांमध्ये ज्या अडचणी येतात त्याचे निरसन करणे, कुठल्या कुठल्या योजनांवरती तुम्हाला माहिती पाहिजे यावरही मेळाव्यातून मार्गदर्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्याचबरोबर राजकारणामध्ये काही गोष्टी आवश्यक असतात, एक म्हणजे आरक्षण महिलांना मिळालेल आहे. पंचायत राज मध्ये ५०% महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा मिळालेली असून महिलांनी अतिशय हुशारीने आणि चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला महिलांसाठी आरक्षण लोकसभा आणि विधानसभेत जाहीर केलेल आहे. लवकरच याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्याला राज्यात पाठिंबा दिला असल्याने येत्या लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त खासदार निवडून देऊन आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा सत्ता मिळवून द्यायची आहे व आपल्या राज्याची प्रगति व विकास घडवून आणायचा आहे असे महिलांना आवर्जून आवाहन केले.   

Web Title: Women's Sena of Shiv Sena works to fight against injustice, for the empowerment of women:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.