तलाव वाचवण्यासाठी महिलांचे प्रयत्न

By Admin | Updated: May 21, 2014 04:40 IST2014-05-21T04:40:17+5:302014-05-21T04:40:17+5:30

कल्याण तालुक्यातील शहराजवळील असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील तलावात मातीचा भराव टाकून अतिक्रमण करण्याचे प्रकार निवडणूक काळात वाढले असून

Women's efforts to save the pond | तलाव वाचवण्यासाठी महिलांचे प्रयत्न

तलाव वाचवण्यासाठी महिलांचे प्रयत्न

वरपगाव : कल्याण तालुक्यातील शहराजवळील असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील तलावात मातीचा भराव टाकून अतिक्रमण करण्याचे प्रकार निवडणूक काळात वाढले असून ते थांबवण्यासाठी आता महिलांनी पुढाकार घेतला आहे. सांगोडा गावातील असाच एक तलाव वाचवण्यासाठी महिला मंडळाने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. कल्याण तालुक्यात १२४ महसुली गावे आणि ४९ पाडे आहेत. प्रत्येक गावात २ ते ३ तलाव आहेत. पूर्वीपासून त्यांचे पाणी ग्रामस्थांसह पशू, पक्षी, जनावरे, शेतीसाठी वापरत होते. साधारणपणे तालुक्यात अडीचशेच्या आसपास तलाव असून बहुतांश तलाव सरकारी जागेवरच आहेत. यात निळजे ग्रामपंचायतीने तलावाचे सुशोभीकरण केले असून उर्वरित तलाव काळानुरूप नष्ट होण्याच्या मार्गावर तर काहींवर अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे ६४ ग्रामपंचायतींमधील केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत तलाव आपले अस्तित्व टिकवून आहेत. सांगोडा गावातील पोवाळ, कोमाली आणि सुकाळा या गावतलावांच्या जागेवर काही ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहे. या तलावांच्या पाण्यामुळे ग्रामस्थांसह पशू, पक्षी, जनावरे यांची पाण्याची सोय होत होती. मात्र, अतिक्रमणामुळे माणसांसह मुक्या जनावरांचीही ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती सुरू होणार आहे. गावाची लोकसंख्या सतराशे ते दोन हजारांच्या आसपास असून नऊ सदस्यांची सांगोडा-वासुंद्री ग्रामपंचायत आहे. शेती मुख्य व्यवसाय असून गाय, म्हशी, बैल ही जनावरेही मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे गावातील सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या महिलांनी कल्याणचे तहसीलदार किरण सुखसे, तलाठी कल्पना पाटील, गटविकास अधिकार्‍यांना भेटून अतिक्रमण हटवण्याचे निवेदन दिले. (वार्ताहर)

Web Title: Women's efforts to save the pond