राम कदमांवर महिला संतापल्या; राज्यात ‘जोडेमार’ आंदोलन, सर्वच पक्षांकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 06:32 IST2018-09-06T06:31:32+5:302018-09-06T06:32:03+5:30
मुलाला एखादी मुलगी पसंत असेल, तर मला कळवा, तिला पळवून तुमच्यासमोर आणेन, या भाजपाचे आमदार राम कदम यांच्या वक्तव्याने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, महिला वर्ग तर फारच चिडला आहे.

राम कदमांवर महिला संतापल्या; राज्यात ‘जोडेमार’ आंदोलन, सर्वच पक्षांकडून निषेध
मुंबई : मुलाला एखादी मुलगी पसंत असेल, तर मला कळवा, तिला पळवून तुमच्यासमोर आणेन, या भाजपाचे आमदार राम कदम यांच्या वक्तव्याने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, महिला वर्ग तर फारच चिडला आहे. कदम यांच्या मुक्ताफळांचा निषेध होत असून, त्यांच्यावर कारवाईच्या मागणीने बुधवारी जोर धरला. दरम्यान महाराष्टÑ राज्य महिला आयोगाने स्वत:च्या अधिकारात याची दखल घेतली असून कदम यांना आठ दिवसांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.
कदम यांच्या विरोधात राज्यात विविध पक्ष-संघटनांनी जोडे मारो आंदोलन केले. सातारा, जळगाव, धुळे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले. सोशल मीडियावर तर संतापजनक प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना घेराव घालून जाब विचारला. कदम यांचे वक्तव्य अयोग्य आहे, असे तावडे म्हणाले. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनाही महिलांनी जाब विचारला. कदम यांनी आज सकाळी तापलेले वातावरण पाहून दिलगिरी व्यक्त केली, पण त्याने समाधान न झाल्याने क्षमाच मागितली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी कदम यांना खुलासा करण्यासाठी बोलाविले आहे. कदम यांचे जे काही वक्तव्य दाखविले जात आहे, ते तसे बोलले असतील, तर आक्षेपार्हच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून दानवे म्हणाले की, कदम यांना मी खुलाशासाठी बोलाविले आहे. त्यानंतर पक्ष योग्य निर्णय घेईल.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात नितीन गडकरी म्हणाले होते की, वाल्याचा वाल्मिकी करण्याची आमच्यात ताकद आहे. राम कदमांवर भाजपाने कारवाई करावी. भाजपाच्या नेत्यांनी ‘बेटी बचाओ’ ऐवजी ‘बेटी भगाओ’ कार्यक्रम सुरू केला आहे का? राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुलाला मुलगी आवडली, म्हणून तिला पळवून आणायला मदत करू, अशी विधाने आमदार करतो, याचा अर्थच भाजपाच्या आमदारांना सत्तेचा माज आला आहे, अशी टीका केली.
प्रदेश महिला काँग्रेसच्या श्रीमती चारूलता टोकस म्हणाल्या की, राम कदम यांनी त्वरित आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा. त्यांच्यावर भाजपाने ताबडतोब कारवाई करावी. ती न केल्यास महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधील काँग्रेसच्या महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.
अखेर मागितली जाहीर क्षमा
माताभगिनींचा सन्मान माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याने मी अधिक खुलासा न करता क्षमा मागतो. - राम कदम