महिला पर्यटकांनो बिनधास्त करा भटकंती ! MTDCकडून पर्यटनावर तब्बल ५० टक्क्यांची सवलत
By स्नेहा मोरे | Updated: December 31, 2023 19:17 IST2023-12-31T19:17:15+5:302023-12-31T19:17:44+5:30
MTDC Tourism: राज्य शासन मागील वर्षांपासून आई महिला केंद्रित पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसह उद्योजकांसाठी विविध योजना राबवित आहेत. आता नव्या वर्षाची भेट म्हणून पर्यटन विभागाने याच धोरणांतर्गत महिला पर्यटकांसाठी विशेष योजना आणली आहे.

महिला पर्यटकांनो बिनधास्त करा भटकंती ! MTDCकडून पर्यटनावर तब्बल ५० टक्क्यांची सवलत
मुंबई - राज्य शासन मागील वर्षांपासून आई महिला केंद्रित पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसह उद्योजकांसाठी विविध योजना राबवित आहेत. आता नव्या वर्षाची भेट म्हणून पर्यटन विभागाने याच धोरणांतर्गत महिला पर्यटकांसाठी विशेष योजना आणली आहे, त्यात आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर १ ते ८ मार्च २०२४ हे आठ दिवस महामंडळाच्या पर्यटन निवासांमध्ये महिलांसाठी तब्बल ५० टक्क्यांची सवलत घोषित केली आहे. त्यामुळे येत्या वर्षांत अधिकाधिक महिला पर्यटनाला चालना मिळावी हा उद्देस आहे.
एमटीडीसीकडून ही सवलत केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील आणि परदेशातील सर्व महिलांसाठी एक खास भेट आहे. ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये केली जाते. रिसॉर्टस आणि पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांचे आदरातिथ्य उत्तमरित्या करणारे महाराष्ट्रामधील नामवंत महामंडळ म्हणून एमटीडीसीकडे पाहिले जाते. महिलांसाठीच्या सवलतीचा लाभ पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.या संधीचा लाभ घेण्याकरिता महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. यासाठी नियम व अटी आहेत. आपले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी आहे.
राज्यभरातील ३४ पर्यटन निवासांची पर्वणी
एमटीडीसीची रिसॉर्ट्स , पर्यटक निवासे ही राज्याच्या कानकोपऱ्यात महत्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत. महामंडळाची एकूण ३४ पर्यटन निवासे, २७ उपहारगृहे असून, निवास व न्याहारी , महाभ्रमण, कलाग्राम, अभ्यागत केंद्र , इको टुरिझम यांसारखे अनुभवात्मक उपक्रम आहेत. तसेच अलिकडेच जबाबदार पर्यटन अंतर्गत एमटीडीसीने मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरु केली आहे. त्याचप्रमाणे बीच रिसोर्ट, हिल रिसोर्ट, जंगल रिसोर्ट असे विविध पद्धतीचे पर्यटक निवास व उपहारगृहे तसेच बोट क्लब, स्कूबा डायविंग इ. जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करतात.
राज्यात सहा जागतिक वारसा स्थळे
महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे राज्य आहे. महाराष्ट्र हे देशातील असे एकमेव राज्य आहे, ज्यामध्ये ६ जागतिक वारसा स्थळे, ८५० हून अधिक लेण्या, ४०० च्या जवळपास दुर्ग व गडकिल्ले आहेत. तसेच महाराष्ट्र विविध पर्वत रांगा, राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्य, समुद्रकिनारे, नद्या, सांस्कृतिक वारसा, रुढी, परंपरा, वेशभूषा, सण, उत्सव यांनी समृद्ध आहे. राज्यातील ही प्रेक्षणीय, निसर्गरम्य, ऐतिहासिक स्थळे देशी आणि विदेशी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.