महिलांनो, स्वत:साठी वेळ काढा, स्वत:साठी जगा, संधीचे सोने करा! ‘लोकमत’ वुमन्स अचिव्हर्स अवॉर्डस चर्चासत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:15 IST2025-10-01T13:14:49+5:302025-10-01T13:15:26+5:30
प्रत्येक महिलेने दिवसातून काही वेळ स्वत:साठीही काढावा आणि स्वत:सोबत समाजाचा विकास घडवून आणावा, असे आवाहन लोकमत वुमन्स अचिव्हर्स अवॉर्डस सोहळ्यातील चर्चासत्रात सहभागी महिला मान्यवरांनी केले.

महिलांनो, स्वत:साठी वेळ काढा, स्वत:साठी जगा, संधीचे सोने करा! ‘लोकमत’ वुमन्स अचिव्हर्स अवॉर्डस चर्चासत्र
मुंबई : आपण आपल्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी त्यांच्या करिअरसाठी किंवा आपल्या घरासाठी कष्ट घेतो. आपला संपूर्ण दिवस घरासाठी जातो. आपण म्हणजे आपले घर यात तीळमात्र शंका नाही. परंतु, आज महिलांना सगळी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर खुली झाली असून, त्यादेखील विविध क्षेत्रात करिअर करत आहेत. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी आता प्रत्येक महिलेने दिवसातून काही वेळ स्वत:साठीही काढावा आणि स्वत:सोबत समाजाचा विकास घडवून आणावा, असे आवाहन लोकमत वुमन्स अचिव्हर्स अवॉर्डस सोहळ्यातील चर्चासत्रात सहभागी महिला मान्यवरांनी केले.
लोढा फाउंडेशनच्या चेअरपर्सन आणि महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षा डॉ. मंजू मंगल प्रभात लोढा यांनी महिलांना देवावर विश्वास ठेवण्यास सांगितले. त्या म्हणाल्या, महिलांनी महिलांसाठी म्हणजे स्वत:साठी जगले पाहिजे. स्वत:साठी जगायला शिकले पाहिजे. महिलांनी शिक्षण घेतले पाहिजे. कारण, शिक्षण घेतल्याने त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहतील. स्वत:ची जागा निर्माण करतील. आपण आपले कौतुक करत नाही. महिलांनी स्वत:चे कौतुक करायला शिकले पाहिजे. स्वत:ला शाबासकी दिली पाहिजे आणि ताठ मानेने जगले पाहिजे.
आयएसएआरच्या अध्यक्षा आणि बल्मू आयव्हीएफ समूहाच्या वैद्यकीय संचालिका प्रा. नंदिता पालशेतकर म्हणाल्या, महिला या मल्टी टास्किंग आहेत. एकाच वेळी त्या अनेक विषय करू शकतात. मात्र, महिलांसमोर अडचणीही अनेक असतात. आरोग्याच्या समस्या आहेत. महिला त्यावर मात करतीलच. मात्र, कुटुंबाने आणि समाजाने त्यांना समजावून घेतले पाहिजे. समाजात महिलांच्या समस्यांबाबत पुरेशी जनजागृती झाली पाहिजे.
महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, कारण याची गरज आहे. वैद्यकीय समस्यांवर महिलांनी मात केली पाहिजे.
विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा परिषा सरनाईक म्हणाल्या, आपली स्पर्धा ही इतर कोणाशी नाहीतर आपली स्पर्धा आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपण सुरुवात केली पाहिजे. आपली आई, बहीण, नवरा आपल्यासोबत आहेच. मात्र, आपण आपल्यासाठी उभे राहिले पाहिजे. मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपण जग पादक्रांत करू शकतो. कायम आपल्यासोबतच्या लोकांना मदत करा. असे केल्याने आपण साहजिकच
मोठे होतो.
आस्क फाउंडेशन २४ च्या फाउंडर अवनी अगस्थी यांनी महिलांच्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले. सर्वांची काळजी घेताना महिलांनी स्वत:चेही आरोग्य जपले पाहिजे, असे आवाहन केले. आपल्याला आपल्यामध्ये बदल घडवावा लागतो. समाजात आणि कुटुंबात जगताना अडचणी असतात. आपण त्यावर मात केली पाहिजे. कुटुंबानेही महिलांना समाजवून घेतले पाहिजे.
बाकलीवाल फाउंडेशन कॉलेजच्या विश्वस्त व कार्याध्यक्ष सीमा बाकलीवाल म्हणाल्या, एकदा कामाला सुरुवात केली की, आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. आपल्या कामावर फोकस करा. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी जिद्द लागते. आपल्याकडे इच्छाशक्ती असेल, तर आपण कोणतीही गोष्ट सहज करू शकतो. महिलांनी ठरविले तर त्या सहज यश संपादन करू शकतात. कारण, आपणच आपली मदत करू शकतो हे कायम ध्यानात ठेवा आणि असे केले, तर आपली स्वप्न पूर्ण होतात.
क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट व आहार तज्ज्ञ ख्याती रूपानी म्हणाल्या, कोणतेही क्षेत्र असो, महिलांना कायम संयम बाळगला पाहिजे. महिलांना कायमच आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. सुरुवातच मुळात पाळीपासून होते. आपल्याला पाळी येत नाही, असे म्हटल्यावरच आपले कसे होणार ? याचे विचाराने महिला मानसिक ताणाखाली जातात. मात्र सारासार विचार करा. हिंमत ठेवा आणि आरोग्याच्या समस्यांबाबत चालते बोलते व्हा.
पद्मावती पल्प अँड पेपर मिल्स व निक्को वेलनेस डॉ. फोरम देढिया यांनीही महिलांनी जिद्दीने विविध क्षेत्र पादक्रांत करण्यासाठीचे आवाहन केले. स्वत:चे आरोग्य जपण्याचे आवाहन केले. कुटुंबाने आणि समाजाने महिलांना सन्मानीय वागणूक देतानाच त्यांना समजावून घेतले पाहिजे. शिवाय महिलांनी शिक्षण घेत मेहनतीने यश संपादन केले पाहिजे. स्वत:साठी वेळ देतानाच स्वत:ची कौशल्य पणाला लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जेव्हीएम स्पेसचे संचालक मंथन मेहता यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. त्यांनी भारतीच्या आर्थिक विकासात महिला आपला वाट कशा उचलू शकतात? यावर उपस्थितांना बोलते केले. विशेषत: मुलगी शिकली, प्रगती झाली. या वाक्याचा दाखला त्यांनी दिला. महिलांना शिक्षणाची कवाडे केव्हाच खुली झाली आहेत. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात बिल्कुल मागे हटता कामा नये, असे म्हटले. शिवाय महिलांना त्यांच्या कुटुंबानेही सहकार्य केले, तर त्यांना सहज गगन भरारी घेता येईल, असेही नमूद केले.
चर्चासत्राच्या प्रारंभी अंकिता नाईक यांनी नृत्य सादर करत रसिकप्रेक्षकांची मने जिंकली. तर आस्क फाउंडेशन २४ आणि मिराकेम इंडस्ट्रीज (ॲम्पल मिशन, ब्रेथिंग लाइफ इन टू फॅब्रिक) हे या सोहळ्याचे प्रायोजक होते.