राजकारणात महिलांना स्वतंत्र निर्णयाधिकार हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 06:39 IST2025-03-09T06:39:55+5:302025-03-09T06:39:55+5:30
स्त्रियांचा राजकारणातील सहभाग वाढायला हवा - राज ठाकरे

राजकारणात महिलांना स्वतंत्र निर्णयाधिकार हवा
मुंबई : महिलांच्या शक्तिशाली अंतःप्रेरणेतून निर्माण होणारे काम मोठे असते. त्यामुळे मोठे परिवर्तन अपेक्षित असेल तर स्त्रियांचा राजकारणातील सहभाग वाढायला हवा. त्यासाठी आरक्षण देणे पुरेसे नाही तर त्यांना राजकारणात त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेण्यासाठी व्यवस्था निर्माण करायला हवी, अशी अपेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केली.
भारतासह जगासमोरील अनेक आव्हानांपैकी पर्यावरणाचा ऱ्हास हेही एक आहे. यावर महिला अगदी मनापासून काम करतात, असे नमूद करीत त्यांनी २०२५ सालच्या 'विमेन ऑफ द इयर' 'पूर्णिमादेवी बर्मन' यांचे उदाहरण दिले. बर्मन यांनी आसाममध्ये १०,००० महिलांची संघटना बांधून करकोचा पक्षी वाचवण्यासाठी चळवळ सुरू केली. त्याचा परिणाम म्हणून जे करकोचे नामशेष पक्ष्यांच्या यादीत गेले होते ते पुन्हा पुनर्स्थापित झाले, असे राज यांनी सांगितले.
महिलांच्या सर्जनशीलतेला माझ्या पक्षात पूर्ण वाव मिळेल, अशी ग्वाही देताना, महिलांच्या अंतःप्रेरणेला, त्यांच्या शक्तीला अधिक ताकद मिळू दे, अशी इच्छाही ठाकरे यांनी व्यक्त केली.