मुंबई : घाटकोपरमध्ये खासगी कॅब प्रवासादरम्यान वाटेत बसलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने दमदाटी करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका नामांकित एअरलाइन्समधील पायलट तरुणीने केला आहे. तरुणीच्या आरोपावरून घाटकोपर पोलिसांनी चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. प्रवासादरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिस घटनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
घाटकोपरमध्ये एकट्या राहणाऱ्या २५ वर्षीय महिला तक्रारदार या नामांकित एअरलाइन्समध्ये पायलट आहेत. तर, त्यांचे पती इंडियन नेव्हीमध्ये नोकरीला आहे. त्या १९ जूनला पतीला भेटून रात्री १०:४५ वाजता फोर्ट येथून कॅबने घाटकोपरच्या दिशेने येत होत्या.
दमदाटी करण्याचा प्रयत्न
२५ मिनिटांच्या प्रवासानंतर चालकाने मार्ग बदलून दुसरीकडे गाडी थांबवून दोन अनोळखी व्यक्तींना गाडीत बसवले. त्यातील एक जण समोरच्या सीटवर बसला आणि दुसरा बाजूला पाठीमागे येऊन बसला.
दोघांचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे होते. बाजूला बसलेल्या व्यक्तीने अचानक उजवा हात पकडून पिरगळला. त्यामुळे आरडाओरड करत असताना समोर बसलेल्या व्यक्तीने दमदाटी करत अश्लील स्पर्श केला. हा सर्व प्रकार सुरू असताना चालक मात्र शांतपणे टॅक्सी चालवत होता.
नाकाबंदीमुळे दोघे जण पसार
थोड्याच वेळात पुढे एका ठिकाणी पोलिस नाकाबंदी चालू असल्याचे दिसताच, चालकाने गाडीचा वेग कमी केला. दोघे जण तेथून पसार झाले. मुंबईत नवीन असल्याने हा प्रकार घडला त्या ठिकाणाची माहिती नाही. रात्र असल्याने आणखी विचित्र घटना घडू नये, म्हणून प्रथम घर गाठण्याचा निर्णय घेतला.
घराजवळ जाऊन चालकाला त्या दोन तरुणांबाबत विचारणा केली, तेव्हा तो निरुत्तर होता. भाड्याचे पैसे घेऊन तोही घाईघाईत निघून गेला, असा दावा तक्रारदार महिलेने केल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘जबाबात विसंगती’
पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तपास सुरू केला आहे. तिच्या जबाबात बऱ्याच विसंगती असल्याचेही दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.