मुंबई - ओशिवरा येथील इन्फिनिटी मॉलमध्ये एका कंपनीत मराठी मुस्लीम महिला कर्मचाऱ्याचा परप्रांतीय कर्मचाऱ्याने फोटो काढून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेकडून तक्रार आल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी विनयभंग करणारा आकाश शर्मा याला चोप देत त्याला माफी मागण्यास भाग पाडले. सोमवारी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
इन्फिनिटी मॉलमधील एका कंपनीत सुमारे ४० महिला काम करत आहेत. त्यातील काउंटरवर काम करणाऱ्या एका महिलेचे कंपनीतीलच आकाश शर्मा याने मोबाइलमध्ये काही फोटो काढले. महिलेने त्याचा जाब विचारताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी मोबाइलमधून फोटो डिलीट करत समज देऊन सोडून दिले होते.
कामावरून काढून टाकलेपोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून कंपनीने महिलेस कामावरून काढले. तिने मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्याकडे मदत मागितली. देसाई यांनी मनसैनिक प्रशांत राणे आणि राजेश म्हात्रे यांच्यासह मॉलमध्ये जाऊन आकाशला चोप देत महिलेस कामावरून का काढले याची विचारणा केली.
मनसेच्या दणक्यानंतर त्या कर्मचाऱ्याने तिची माफी मागितली. कंपनीने तिला पुन्हा कामावर घेतले आहे. परप्रांतीय कर्मचाऱ्यांकडून मराठी कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यांची ही मोडस ऑपरेटन्सी असून ती मोडीत काढली पाहिजे.- संदेश देसाई, वर्सोवा विभाग अध्यक्ष