Join us

महिला वकिलाची पतीनेच केली हत्या, वैवाहिक कलहामुळे उचलले पाऊल; आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:38 IST

पवईतील अंधेरी-कुर्ला रोड येथील एका राहत्या घरात शनिवारी रात्री ६० वर्षीय निवृत्त एअर इंडिया कर्मचाऱ्याने ५४ वर्षीय वकील पत्नीची उशीने नाक दाबून हत्या केल्याचे उघड झाले आहे. 

मुंबई : एक कर्तव्यनिष्ठ आणि जागरूक वकील म्हणून घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये अनेक महिलांना न्याय मिळवून दिला. परंतु, एक दिवस त्यांनाच घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागेल याची कल्पना त्यांना नव्हती. पवईतील अंधेरी-कुर्ला रोड येथील एका राहत्या घरात शनिवारी रात्री ६० वर्षीय निवृत्त एअर इंडिया कर्मचाऱ्याने ५४ वर्षीय वकील पत्नीची उशीने नाक दाबून हत्या केल्याचे उघड झाले आहे. 

राजीव चंद्रभान असे आरोपीचे नाव असून, तो आपला मोबाइल फोन आणि कारची चावी घटनास्थळी विसरून गेला होता. ते घेण्यासाठी तो पुन्हा फ्लॅटवर आला आणि पोलिसांच्या हाती लागला.  याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

भांडण गेले विकोपाला  सावित्रीदेवी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, त्या पवईच्या रहेजा विहार येथे एकट्या राहत होत्या. राजीव आणि सावित्रीदेवी यांचे १९९५ मध्ये लग्न झाले होते. मात्र, १९९७ पासून ते वेगवेगळे राहत होते. शनिवारी रात्री राजीव काही दस्तऐवज घेण्यासाठी सावित्रीदेवी यांच्या घरी गेला होता. तेथे सावित्रीदेवी यांनी पुन्हा नांदावे, असा तगादा राजीव याने लावला. परंतु, त्यांनी  नकार दिल्याने भांडण विकोपाला गेले. रागाच्या भरात राजीवने उशी तोंडावर दाबून सावित्रीदेवी यांची हत्या केली.

सावित्रीदेवी व्यवसायाने वकील असून, घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांत त्यांनी अनेक महिलांना न्याय मिळवून दिला होता.

कारच्या चाव्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला राजीव उत्तररात्री १:३० च्या सुमारास घटनास्थळावरून पळून गेला. पण, मोबाइल आणि कारच्या चाव्या तिथेच राहिल्याचे लक्षात आल्यानंतर तो पुन्हा घटनास्थळी दाखल झाला. रात्री २ च्या सुमारास शेजाऱ्यांनी घराचे दार उघडे असल्याचे पाहून पोलिसांना कळवले.  पोलिसांनी सावित्रीदेवी यांना तत्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी उपचाराआधीच त्यांना मृत घोषित केले.  सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल आणि कारच्या चाव्यांमुळे पोलिसांचा राजीववरील संशय अधिक बळावला.  अखेर कसून चौकशी केल्यानंतर राजीवने गुन्ह्याची कबुली दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife Killed by Husband Due to Marital Dispute; Accused Arrested

Web Summary : Mumbai: A retired man killed his lawyer wife following a marital dispute. The argument escalated when she refused reconciliation, leading to murder by suffocation. The husband was arrested after returning for forgotten items.
टॅग्स :गुन्हेगारीपती- जोडीदार