आरेत बिबट्याची दहशत; महिलेवर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 22:46 IST2021-09-29T22:45:56+5:302021-09-29T22:46:30+5:30

Aarey Colony: आरे मध्यवर्ती  कार्यालय विसावा येथे सुमारे आठच्या सुमारास बिबट्याने पाठीमागून येत एका महिलेवर जोरदार हल्ला केला.

Woman injured leopard Attack in Aarey Colony, atmosphere of fear among citizens | आरेत बिबट्याची दहशत; महिलेवर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

आरेत बिबट्याची दहशत; महिलेवर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : आरेत आता बिबट्या कधी कोणावर हल्ला करेल याचा नेम नाही. गोरेगाव (पूर्व ) आरे मध्ये युनिट नंबर ३ च्या सरकारी निवासस्थान येथे राहत असलेल्या कुमार आयुष यादव या ४ वर्ष वयाच्या बालकावर बिबट्याने दोन दिवसांपूर्वी हल्ला केला होता. सदर घटना ताजी असताना आज आरे मध्यवर्ती  कार्यालय विसावा येथे सुमारे आठच्या सुमारास बिबट्याने पाठीमागून येत एका महिलेवर जोरदार हल्ला केला. येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश धुरी यांनी सदर हल्ला कसा झाला याचा व्हिडिओ 'लोकमत'ला दिला.

महिला घरातून बाहेर काठी टेकत आली आणि येथील कठड्यावर बसली आणि मग लगेच चक्क मागून येत बिबट्याने तीच्यावर हल्ला केला. बिबट्या या महिलेवर हल्ला केला. यावेळी या शूर महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या हातातील काठीने बिबट्यावर प्रति हल्ला करत त्याचा हल्ला परतवून लावला. यानंतर आजू बाजूला राहणारे नागरिक येथे आले. तेव्हा या महिलेने बिबट्याने हल्ला कसा केला आणि आपण कशी सुटका केली, हे सांगितले.

या भागात वनखात्याने रात्रीची  गस्त वाढवावी, प्रखर दिवे लावावे आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावावे अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ते निलेश धुरी यांनी केली. दरम्यान, आरे वसाहतीत गेले अनेक महिने बिबट्या येत आहे. आता बिबट्याने आपला मोर्चा आरेत वळवला असून तो चक्क येथील नागरिकांवर हल्ला करू लागल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वनखात्याने गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याचा लवकर बंदोबस्त करण्यासाठी त्याला जेरबंद करून पिंजरे लावावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

लोकमतने देखील गेले काही महिने बिबट्याच्या बातम्या सातत्याने दिल्या असून लोकप्रतिनधी व वनखात्याचे लक्ष वेधले आहे. मात्र अजून वनखाते मार्गदर्शनपर बैठका घेत आहे. मात्र आता बिबट्याचे येथील नागरिकांवरील हल्ले वाढल्याने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाय योजना वनखाते कधी करणार असा सवाल आरेवासीयांनी केला आहे.

Web Title: Woman injured leopard Attack in Aarey Colony, atmosphere of fear among citizens