Join us

‘लिव्ह इन’मधील महिलेची आत्महत्या; फरहाना, आतिकमध्ये सतत वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 11:12 IST

फरहाना ही प्रियकर आतिक मन्सुरी याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहत होती. फरहानाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून अतिकने तिच्या मावस भावाशी संपर्क साधला.

मुंबई : प्रियकरासोबत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या फरहाना खान (३२) हिने गळफास घेतल्याची घटना सांताक्रूझ पूर्वेकडील वाकोला परिसरातील वडावरी नगर येथे नुकतीच घडली आहे.

फरहाना ही प्रियकर आतिक मन्सुरी याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहत होती. फरहानाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून अतिकने तिच्या मावस भावाशी संपर्क साधला. दोघांनी मृतदेह थेट रुग्णालयात नेला. फरहानाच्या मृत्यूबाबत समजताच तिच्या पालकांनी अतिकवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

फरहाना, आतिकमध्ये सतत वाद

फरहाना आणि आतिक यांच्यात सतत वाद होत असत, त्यामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलले, असे पालकांचे म्हणणे होते. त्यानुसार सध्या आम्ही याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला आहे.

मृतदेहाची उत्तरीय तपासणी पूर्ण झाली असून, व्हिसेरा पुढील चाचणीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आम्ही आतिकची चौकशी करत असून तो दोषी आढळल्यास त्याच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :गुन्हेगारी