VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:20 IST2025-10-16T14:19:03+5:302025-10-16T14:20:20+5:30
पश्चिम रेल्वे लाइनवरील राम मंदिर स्थानकात बुधवारी मध्यरात्री माणसाच्या रुपात देवदूत कसा मदतीसाठी धावून येतो याची प्रचिती आली.

VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
पश्चिम रेल्वे लाइनवरील राम मंदिर स्थानकात बुधवारी मध्यरात्री माणसाच्या रुपात देवदूत कसा मदतीसाठी धावून येतो याची प्रचिती आली. धावत्या लोकलमध्ये प्रसुती वेदना सुरू झालेल्या महिलेची एका तरुणानं प्रसंगावधान दाखवत आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करत सुखरुप प्रसुती केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे आणि तरुणाचं सर्वस्तरातून कौतुक केलं जात आहे.
गर्भवती महिलेसाठी देवदूत ठरलेल्या तरुणाचं नाव विकास दिलीप बेद्रे असं आहे. बॉलीवूडच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटात ज्यापद्धतीनं नायक रँचो अभिनेत्रीला व्हिडिओ कॉल करुन तिच्या बहिणीची प्रसुती करतो. अगदी तसाच प्रसंग रिअल लाइफमध्ये मुंबईत घडला. बुधवारी मध्यरात्री १२.४० च्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरुन मुंबईकडे लोकलने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसुती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली. पण नेमकं काय करावं ते कुणालाच काही कळलं नाही. यावेळी त्याच डब्यातून प्रवास करणारा विकास बेद्रे धावून आला. त्याने लोकलची चैन खेचली. यामुळे लोकल राम मंदिर स्थानकात थांबवली गेली. महिलेला प्रचंड वेदना होत होत्या. बाळ अर्धे बाहेर आणि अर्धे आत अशा नाजूक स्थितीत होते. अशावेळी महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत नेणेही कठीण होते. विकास यानं तातडीनं आपली डॉक्टर मैत्रिण असलेल्या डॉ. देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल लावला. यानंतर विकास बेद्रे यांनी व्हिडिओ कॉलवर प्रसुतीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. विकासनं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मोठ्या हिमतीनं परिस्थिती हाताळली. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन केलं. त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि राम मंदिर स्थानकात मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. गोंडस बाळाचा जन्म झाला. विकासनं मुलगा झाल्याचं जाहीर केलं आणि उपस्थित सर्वांना भरुन आलं.
बाळ आणि आई सुखरुप झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. रेल्वे पोलिसांच्या मदतीने बाळ आणि आईला रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं गेलं. सध्या बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती सुखरुप असल्याची माहिती समोर आलीय. धावत्या मुंबईचा माणुसकीचा चेहरा त्या मध्यरात्री पुन्हा एकदा अनुभवता आला. विकास बेद्रे या रिअल लाइफ हिरोचं...त्यानं दाखवलेल्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होतंय आणि त्याचं कौतुक करावं तितकं कमीय इतकं नक्की. विकास बेद्रे तू खरंच समस्त मुंबईकरांचा अभिमान आहेस.