दाऊदच्या साथीदाराला पकडून देणाऱ्या महिलेची सायबर फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:28 IST2025-05-28T10:28:09+5:302025-05-28T10:28:09+5:30
गुंतवणुकीबाबत बाॅलिवूड अभिनेत्री करिना कपूरची बनावट जाहिरात दाखवून तिला गंडविण्यात आले आहे

दाऊदच्या साथीदाराला पकडून देणाऱ्या महिलेची सायबर फसवणूक
मुंबई : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या साथीदाराला पकडण्यात मदत करणारी महिला सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकली आहे. यामध्ये महिलेची २३ लाख रुपयांना फसवणूक झाली असून, गुंतवणुकीबाबत बाॅलिवूड अभिनेत्री करिना कपूरची बनावट जाहिरात दाखवून तिला गंडविण्यात आले आहे. या प्रकरणी पश्चिम विभाग सायबर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
तक्रारदार महिला वांद्रे पश्चिम परिसरात राहण्यास असून, सामाजिक कार्यकर्ती आहे. तिला सोशल मीडियावरील एक्स ॲपवर गुंतवणुकीसंदर्भात एक लेख वाचनात आला. यात बाॅलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि गायिका श्रेया घोषाल यांच्या गुंतवणुकीसंदर्भात बनावट जाहिराती होत्या. याच जाहिरातीला बळी पडून महिलेने त्यात देण्यात आलेली लिंक ओपन केली. त्यानंतर, लगेचच तिला साशा नावाच्या महिलेने काॅल करीत फाॅक्सोनेट नावाच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक फर्ममधून बोलत असल्याचे सांगितले.
सायबर पोलिसांकडे धाव; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा
महिलेला कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करण्यास आणि तेथे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आरोपींनी महिलेचे आभासी ट्रेडिंग खाते उघडून सागर, माया आणि राघव यासारख्या नावांचा वापर करीत आंतरराष्ट्रीय फोन नंबरद्वारे तिच्याशी संपर्क साधला. तक्रारदार महिलेने २५ एप्रिल ते ६ मेदरम्यान एकूण २३ लाख ४५ हजार रुपयांची गुंतवणूक केली.
यातील अवघे एक लाख ६३ हजार रुपये तिला काढता आले. मात्र, उर्वरित रक्कम काढता आली नाही. पुढे आणखी पैशांची मागणी झाल्याने महिलेला संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.