Join us
Daily Top 2Weekly Top 5

कानाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात गेलेल्या महिला पोलिसाचा मुंबईत मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:39 IST

मुंबई पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Police : मुंबईत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अंधेरीत मुंबई पोलीस दलात कार्यरत महिला कॉन्स्टेबलला एका शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिला कॉन्स्टेबलला शस्त्रक्रियेसाठी भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनं कॉन्स्टेबलच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे महिला कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा आणि कुटुंबियांचा आरोप आहे. 

मुंबई पोलीस दलातील २८ वर्षीय महिला कॉन्स्टेबलचा एका खाजगी रुग्णालयात कानाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्याने गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर मृत्यू झाला. अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील यांना कानाचा त्रास जाणवत होता. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. त्यानुसार कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील यांना अंधेरीच्या पश्चिम उपनगरातील लोखंडवाला येथील ऍक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाल्या. शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आल्यानंतर गौरी पाटील यांना भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं. मात्र यानंतर गौरी पाटील यांची प्रकृती खालवली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाटील यांच्या कुटुंबियांना शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.

गौरी पाटील यांना कानाच्या शस्त्रक्रियेपूर्वी तिला भूल देण्यात आली. मात्र यावेळी गुंतागुंत निर्माण झाली आणि गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. रात्री १०.४५ च्या सुमारास पोलिसांना रुग्णालयाकडून गौरी यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गौरी पाटील यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गौरी पाटील या मुंबई पोलिसांच्या अंधेरीतील मरोळ शस्त्र विभागात तैनात होत्या. 

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीसगुन्हेगारी