दिव्यांग मुलीला ठार मारून महिलेने केली आत्महत्या; मुंबईतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 06:26 AM2020-01-31T06:26:40+5:302020-01-31T06:27:10+5:30

मीरा परांजपे (७३) व मंजिरी परांजपे (५३) असे मृत मायलेकींची नावे आहेत.

Woman commits suicide after killing a disabled girl; Events in Mumbai | दिव्यांग मुलीला ठार मारून महिलेने केली आत्महत्या; मुंबईतील घटना

दिव्यांग मुलीला ठार मारून महिलेने केली आत्महत्या; मुंबईतील घटना

Next

मुंबई : पतीचे निधन झालेले, मुलगा परदेशात असल्याने त्याचाही आधार नाही, ५३ वर्षीय मानसिक रुग्ण असलेल्या मुलीच्या भविष्याची चिंता आणि वृद्धापकाळामुळे विविध आजारांना कंटाळून ७३ वर्षीय महिलेने स्वत:सह मुलीचे आयुष्य संपविल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. मीरा परांजपे (७३) व मंजिरी परांजपे (५३) असे मृत मायलेकींची नावे आहेत.

परांजपेवाडीत या मायलेकी गेल्या अनेक वर्षांपासून राहत होत्या. मीरा यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. मुलगा परदेशात आहे. मुलगी मंजिरी अविवाहित व लहानपणापासूनच मानसिक आजारी होती. मीरा यांचे पती हयात असेपर्यंत ते दोघे मंजिरीची काळजी घेत. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर घरात मंजिरीची सेवाशुश्रूषा मीरा यांना एकटीलाच करावी लागत होती. त्यातच वृद्धापकाळामुळे सुरू झालेल्या तब्येतीच्या तक्रारींमुळे त्या वैतागल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी घरकाम करणाऱ्या महिलेने नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठच्या सुमारास परांजपे यांच्या घराची बेल वाजवली. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तिने शेजाऱ्यांच्या मदतीने परांजपे यांच्या नातेवाइकांना कळविले. ही माहिती मिळताच विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे व त्यांचे पथक घटनास्थळी गेले.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून पोलीस घरात शिरले. तेव्हा बेडरूममधील छताला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघी दिसल्या. दोघींनाही स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरने त्यांना तपासून मृत घोषित केले.
मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी दोन्ही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. प्राथमिक तपासात ही आत्महत्याच असून, या प्रकरणी कोणतीही संशयित बाब अद्याप समोर आली नसल्याचे गणोरे यांनी सांगितले. त्यांच्या मुलाला कळविले असून तो परतल्यानंतर दोघींवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

आधी हत्या, नंतर आत्महत्येचा संशय
आजारपणाला कंटाळून मीरा यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असावा. मात्र आत्महत्येपूर्वी त्यांनीच आधी मंजिरीला गळफास लावून तिची हत्या केली असावी, असा अंदाज तपास अधिकाºयांकडून व्यक्त केला जात आहे.

मुलासोबत अखेरचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग
परदेशातील मुलगा त्यांना घरखर्च पुरवत होता. त्यांचे नेहमी मुलासोबत बोलणे होत असायचे. मात्र भवितव्याविषयी दोघीही चिंतेत होत्या. आत्महत्येपूर्वीही त्यांनी मुलासोबत व्हॉट्सअ‍ॅपवरून संवाद साधला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Woman commits suicide after killing a disabled girl; Events in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.