म्युझिक कॉन्सर्ट, गरबा पासच्या आमिषाने महिला व्यावसायिकेला ऑनलाइन गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:07 IST2025-10-09T11:07:34+5:302025-10-09T11:07:49+5:30
विलेपार्ले पोलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा

म्युझिक कॉन्सर्ट, गरबा पासच्या आमिषाने महिला व्यावसायिकेला ऑनलाइन गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इन्स्टाग्रामवर लॅटिन गायकाचा शो आणि गरबा कार्यक्रमाचे पासेस देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिक महिलेची ७३,४०० रुपयांचा ऑनलाइन फसवणूक झाली आहे. कृती दालमिया (३९) असे उद्याेजिकेचे नाव आहे.
कॉर्पोरेट गिफ्टिंग व्यवसाय करणाऱ्या दालमिया यांनी २ जुलै रोजी त्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या खात्यातील पोस्ट्स पाहत होत्या. त्यावेळी त्यांना प्रसिद्ध लॅटिन गायक एन्रिके इग्लेसियस याच्या २९ आणि ३० ऑक्टोबरला होणाऱ्या शोबाबतची जाहिरात दिसली.
१९ तिकिटांच्या नावे ७३,४०० रुपयांची फसवणूक
‘खुशी’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साहिल नावाच्या व्यक्तीने संपर्क साधून त्याच्याकडे तिकिट असल्याचे सांगितले. दालमिया यांनी त्याच्याकडून पाच तिकिटांसाठी ४६,५०० रुपये त्याच्या यूपीआय आयडीवर पाठवले.
यानंतर साहिलने कार्यक्रमाच्या एक महिन्यापूर्वी पास मिळतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दालमिया यांनी जिओ वर्ल्ड, बीकेसी येथे होणाऱ्या फाल्गुनी पाठक यांच्या गरबा कार्यक्रमाचे पासेस मागितले. साहिलने तेही उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यावर दालमिया यांनी १४ पासेससाठी २८,४०० रुपये त्याच यूपीआय आयडीवर ट्रान्सफर केले.
दालमिया यांनी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पासेस मागितले असता, साहिलने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर फसवणूक झाल्याचा संशय येताच त्यांनी सायबर पोर्टलवर आणि विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या विलेपार्ले पोलिस अधिक तपास करत असून, आरोपीचा माग काढण्याचे काम सुरू आहे.