मुंबई - मुंबईकर प्रवाशांच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमांकडून सुरू करण्यात आलेली वोगो सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होते आहे. मात्र, या ई-स्कूटरचा प्रवाशांकडून होणारा गैरवापर आणि त्याचे नुकसान यामुळे ही सेवा गुंडाळावी लागल्याची माहिती बेस्ट उपक्रमांकडून देण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वी ही सेवा सुरू करण्यात आली होती. यासाठी ३० मिनिटांपर्यंत प्रति मिनिट दोन रुपये आणि ३० मिनिटांनंतर अडीच रुपये आकारण्यात येत होते. तिला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र कालांतराने ई-स्कूटर नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले. त्यातील बॅटरीची चोरी आणि इतर नुकसान होण्याचे प्रकार वाढल्याने अखेर ही सेवा बंद करावी लागल्याचे बेस्ट प्रशासनाने सांगितले.
कुठे सुरू होती सेवा? बेस्ट उपक्रमांकडून मुंबईतील प्रामुख्याने दादर पश्चिम, सात रस्ता, वरळी, धोबीतलाव, लालबाग या ठिकाणी ही सेवा देण्यात येत होती. पोगो कंपनीच्या ९८० स्कूटर या सेवेत दाखल करण्यात आल्या होत्या. या माध्यमातून बेस्ट उपक्रमाला सुमारे ६ लाख ९४ हजार ७३२ रुपये इतका महसूल मिळाला. प्रामुख्याने छोट्या उद्योगातील कामगार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला.
वोगो ई-स्कूटर पुन्हा सुरू करण्यात याव्यात. काही मार्गांवर बस जात नाही, तर जवळच्या अंतरात जाण्यासाठी टॅक्सीवाले सुद्धा येत नाहीत. अशा वेळी विशेषत: कॉलेजला वेळेत पोहोचता यायचे. - रोहित तोडकर, महाविद्यालयीन तरुण