Join us  

आईच्या दहाव्याचा विधी न करताच विकास खारगे कामावर झाले हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 2:47 AM

खारगे यांच्या मातोश्री रुक्मीणी शंकर खारगे यांचे १८ मार्च रोजी इचलकरंजी येथे वृध्दापकाळाने निधन झाले.

मुंबई :  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मातोश्रींचे निधन झाले, मात्र त्यांच्या दहाव्याचा कोणताही कार्यक्रम न करताच खारगे मुंबईत परत आले असून कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्याच्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. 

खारगे यांच्या मातोश्री रुक्मीणी शंकर खारगे यांचे १८ मार्च रोजी इचलकरंजी येथे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८२ वर्षे होते. ही बातमी कळताच खारगे तातडीने इचलकरंजीला गेले. १९ तारखेला त्यांनी व त्यांचे चार बंधू, एक बहिण या सगळ्यांनी आईला शेवटचा निरोप दिला. त्यानंतर २२ तारखेला अस्थिविसर्जन करायचे होते. मात्र त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यामुळे या सगळ्या भावडांनी त्या दिवशी पहाटेच उठून अस्थिविसर्जन केले. दिवसभर ते तेथेच थांबले आणि जनता कर्फ्यू पहाटे संपताच गाडीने सरळ मंत्रालय गाठले. गेले काही दिवस ते रोज होणाऱ्या बैठका, आणि कोरोनाच्या अनुषंगाने होणाऱ्या नियोजनात व्यस्त आहेत. 

विकास खारगे हे घरात सगळ्यात छोटे. मात्र त्यांनी अंत्यसंस्कारला होणारी गर्दी, भेटायला येणाऱ्यांनी लांबूनच नमस्कार करावा असा धरलेला आग्रह त्यांचे अशोक, विजय, उध्दव, माणिक हे चार बंधू आणि सौ. सुवर्णा या भगिनी यांनी देखील मान्य केला. कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी आम्ही धार्मिक विधी घरच्या घरी करत आहोत असे सांगून त्यांनी अन्य कोणी येऊ नये असे नम्र आवाहनही केले. देशावर आणि राज्यावर संकट आलेले असताना आपण ज्या पदावर आहोत, काम करत आहोत ते काम १४ दिवस करायचे नाही, हे आपल्या मनाला पटले नाही म्हणून मी कामाला सुरुवात केली असेही खारगे यांनी नम्रपणे सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र